फिलीपाईन्सच्या राष्ट्रपतींचा इशारा; करोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्यांची होणार तुरुंगात रवानगी

मनीला – जगभरात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक देशांनी लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक देशांमध्ये करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी तेथील नागरिक टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे काही देशांनी लस घेणाऱ्या नागरिकांना बक्षीस देण्यास सुरुवात केली आहे. तर फिलीपाईन्समध्ये लस न घेणाऱ्यांची तुरुंगात रवानगी करण्यात येणार असल्याचं समजतं.

फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रॉड्रीगो दुर्तेत यांनी इशारा दिला की, जे लोक करोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करेल त्यांना तुरुंगात डांबण्यात येईल.

राष्ट्रपती दुर्तेत म्हणाले की, तुम्ही लस घेतली नाही आणि तुम्ही करोना संसर्गाचे वाहक आहात, तर इतर लोकांच्या बचावासाठी मला तुम्हाला तुरुंगात पाठवावे लागेल. त्यामुळे प्रत्येक गावातील नेत्यांनी लस घेण्यास नकार देणाऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

देश सध्या गंभीर स्थितीतून जात आहे. त्यामुळे मला चुकीचं ठरवू नये.  करोनाच्या पहिल्या लाटेने आपल्या येथील यंत्रणा आणि सुविधांना नष्ट केलं आहे. करोनाची आणखी एक लाट देशाला विनाशाकडे घेऊन जाईल. त्यामुळे आपण जेवढे कठोर निर्णय घेऊ तेवढ चांगलं आहे, असं राष्ट्रपती दुर्तेत यांनी म्हटलं आहे.

फिलीपाईन्समध्ये करोनाने हाहाकार माजवला आहे. येथे करोना संसर्गामुळे आतापर्यंत २३ हजारहून अधिक लोक दगावले आहेत. सध्या या देशात ५५ हजार ८४७ ऍक्टीव्ह रुग्ण आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.