रांची – काही दिवसांपूर्वीच गुजरात येथील नवविवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून नदीत उडी टाकून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी तिने एक व्हिडीओ देखील तयार केला होती. व्हिडीओमध्ये तिने सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या त्रासाबद्दल म्हटलं होतं. आता पुन्हा एक अशीच घटना समोर आली असून आणखी एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. विशेष म्हणजे या विवाहितेने देखील मृत्यूपूर्वी व्हिडीओ बनवून शेअर केला आहे.
रेल्वे कर्मचारी आलोक प्रसाद याची 21 वर्षीय पत्नी कोमल पटेल हिने बुधवारी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी कोमलने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यात रडत-रडतच तिने आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं.
“बाबा, मी सुसाईड करत आहे. पुन्हा सासरी येऊन खूप मोठी चूक केली. सॉरी पापा, मी तुमचं म्हणणं ऐकलं नाही. मला वाटलं माझा नवरा सुधारला असेल. पण त्याने पुन्हा मला मारहाण करण्यास सुरुवात केली. बाबा, माझ्या मुलाची काळजी घ्या” असं ती व्हिडीओमध्ये म्हणाली.दरम्यान या प्रकरणी कोमलचा पती आलोक प्रसाद, सासू, नणंद आणि नणंदेचा नवरा अशा सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार केली आहे.
2018 मध्ये कोमल आणि आलोक यांचा विवाह झाला होता. त्यावेळी कोमलच्या वडिलांनी लग्नात घरातील सामानासह दागिने आणि दहा लाख रुपये दिले होते. मात्र आता तिच्याकडे कार आणण्यासाठी वारंवार दबाव आणला जात होता. या जाचाला कोमल कंटाळली होती. कोमलच्या आत्महत्येनंतर आलोक कुटुंबासह पसार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.