पुस्तक परीक्षण : वाडा कसा पाहावा

साक्षी कोळी

विलास कोळी यांनी ऐतिहासिक वारसा आणि संस्कृती टिकविण्यासाठी सुंदर पुस्तक लिहिलेले आहे. शीर्षकावरूनच चटकन कल्पना येते. सुरुवातीची दोनचार पाने वाचली की, वाचकाला एका वेगळ्याच विश्‍वात प्रवेश केल्याचे जाणवते. हे पुस्तक काल्पनिक नसून वाडा, गढी व त्यावरील अभ्यास, निरीक्षण, माहिती संकलन आणि संशोधन यासाठी लेखकाने गेली 15 वर्षे वाहिलेली आहेत. हे अगदी प्रारंभीच जाणवते. पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच ऐतिहासिक जुना वाडा उभा राहतो.

हे पुस्तक वाचत असताना लेखक आपणाला 21 व्या शतकातून 17 व्या शतकात कधी घेऊन जातात हे कळतच नाही. वाड्याच्या पहिल्या पायरीपासून ते टोकाच्या झेंड्यापर्यंतच्या आठवणी या पुस्तकात आहेत. जुन्या पिढीतील बांधकामे आणि आताच्या इंजिनिअरिंगला लाजवेल असे त्या काळात वापरलेले तंत्र याचा उलगडा मोठ्या पोटतिडकीने या पुस्तकात लेखकाने केलेला दिसतो. का जाणवतो वाड्यात शिरल्याबरोबर उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात उष्णता, कसे ओळखत पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी दगड व कोणता दगड कोठे वापरत, का करत दगडी जमीन सर्वात शेवटी. का वापरले आपल्या पूर्वजांनी दगडासारखे चिरस्थायी माध्यम, का घेत होते वाड्याचे जोते कमरेइतके उंच, का सोडत होते वाड्यात मध्यभागी मोकळी जागा, का लावल्या जात जोत्याला गोल रिंगा, का लागत नव्हती पूर्वी लाकडांना वाळवी, का पाजले जाई लाकूड कामाला बिब्ब्याचे, बेलाचे व जवसाचेच तेल, कशी असायची कारागिरांची कल्पनाशक्‍ती आणि अचूक नियोजन.

सडासारवण, रांगोळी, पुष्करणी, कारंजे, भक्‍कम लाकडी दरवाजे, उंबरा, दगडी चौक, माजघर, ओसरी, पाटाईचं छत, कडीपाटाचे छत, लग, तुळ्या, खण, सर, हस्त, खुंटी, कोनाडे, देवड्या, देवळी, कडीकोयंडे, बिजागऱ्या, कमानीच्या खिडक्‍या, अडसर, कारंजे, तळखडे, महिरपी, गणेशपट्टी, हंड्या-झुंबर, पाणीपट्टी, नळ्याची कौलं, खापरेली कौलं, भित्तीचित्र ही वाड्याची वैशिष्ट्ये. हे शब्द काही वर्षांनंतर ऐकायला देखील मिळणार नाहीत. अशा कितीतरी घटकांची माहिती आणि त्यांचे त्याकाळातील महत्त्व या पुस्तकात आहे. एकूण 60 प्रकरणांमधून याविषयीची माहिती लेखकाने दिली आहे. विषय समजावा म्हणून जे हजार शब्दांत सांगता येत नाही ते 1 फोटो सांगून जातो. त्यामुळे 30-40 रंगीत फोटोंचा वापर केलेला आहे. 

वाडा कसा पाहावा हे पुस्तक नुकतेच ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही नि:शंक मनाने वाडा, गड, किल्ला पाहायला जाऊ शकता. ज्यावेळी वाडे बांधले गेले असतील तेव्हा त्यांचा जो काही थाट असेल तो वेगळाच असणार. दगड, विटा, भेंडे, चुना, सागवान, शिसम वापरून बांधलेला वाडा जो आजही उत्तम प्रकारे दिमाखात उभे आहेत. 

असे वाडे पाहायला वास्तुविशारद, इतिहासकार, अभ्यासक, पर्यटक, दुर्गप्रेमी, मूर्तिकार, फोटोशूट, शुटींगसाठी लोक भेटी देत असतात. आजही चित्रपट, मालिका जुन्या वाड्याशिवाय परिपूर्ण होऊच शकत नाहीत, हे विशेष आणि अभ्यास करण्यासारखे आहे हे लेखकाला इथे सांगावेसे वाटते. भविष्यात आपणाला जुन्या बांधकामाची जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा तो काळ काय आणि कसा होता याची साक्ष देणारी वाडा कसा पहावा हे पुस्तक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.