पुणे, दि. 5 -करोनाच्या पार्श्वभूमीवर करंडक स्पर्धेच्या निकालानंतरची आरोळी नाट्यगृहांबाहेर नव्हे, तर “व्हर्च्युअली’ दुमदुमली. यंदाच्या “सिम्बायोसिस नाट्यवाचन करंडक’ स्पर्धेत सिंहगड महाविद्यालयाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला.
दरवर्षी महाविद्यालये सुरू झाल्यानंतर करंडक स्पर्धांचे वेध कलामंडळातील विद्यार्थ्यांना लागतात. मात्र, यंदा करोनामुळे डिसेंबरमध्येही महाविद्यालये सुरू न झाल्याने, अनेक करंडक स्पर्धा रद्द झाल्या. तर सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि महाविद्यालयाच्या मराठी नाट्य मंडळाच्या वतीने “सिम्बायोसिस नाट्यवाचन करंडक’ स्पर्धेचे (सुमन करंडक) आयोजन ऑनलाईन पद्धतीने केले होते.
दि.2 आणि 3 डिसेंबर या नाट्यवाचन स्पर्धा ऑनलाइन पार पडली. शनिवारी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. स्पर्धेत सिंहगड अभियांत्रिकी-प्रथम, मॉडर्न-द्वितीय, कमिन्स महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे परीक्षण अभिनेते ओम भुतकर आणि क्षीतिश दाते यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हृषिकेश सोमण आणि डॉ. नीलेश वाघमारे उपस्थित होते. यंदा प्रथमच ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. करोनामुळे पूर्ण संघाला बक्षीस समारंभाला केवळ प्रातिनिधिक एक ते दोन विद्यार्थ्यांना बोलावले होते, अशी माहिती कलामंडळाचे प्रमुख मिहीर अमृतकर यांनी दिली.