अभयारण्यातील जमिनींचे व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

डॉ. भारत पाटणकर यांची मागणी : अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे

सातारा – कोयना अभयारण्यातील शेकडो हेक्‍टर जमिनींचे बेकायदेशीररित्या व्यवहार झाले आहेत. व्यवहार करणाऱ्यांमध्ये देशातील कार्पोरेट कंपन्यांसह राजकीय पुढाऱ्यांचा समावेश असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केली. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जमिनींसाठी बॅंकांनी दिले कर्ज
बेकायदेशीर जमिनीचे व्यवहार झालेले असताना त्यासाठी बॅंकांनी कर्ज दिल्याची बाब समोर आली आहे. धन्वंतरी वनऔषधी संस्थेला सेंट्रल बॅंकेने तर विनायक सुरेश भोसले आणि अतुल सुरेश भोसले यांनी खरेदी केलेल्या जमिनीसाठी आयडीबीआय बॅकेने 10 कोटी आणि शामराव विठ्ठल बॅंकेने 5 कोटी रूपये कर्ज दिले आहे, अशी माहिती डॉ.भारत पाटणकर यांनी दिली.

यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, कोयना अभयारण्यात हस्तांतरण बंदी असतानाही हॉटेल, पवनचक्की, रिसॉर्टसाठी जमिनींचे बेकायदेशीररित्या व्यवहार करण्यात आले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या असहाय्यतेचा फायदा घेवून कवडीमोल किंमतीने जमिनींचे व्यवहार करण्यात आले आहेत. व्यवहार करणाऱ्यांमध्ये सर्जन रिऍलिटी, मेसर्स सागर एजन्सी, व्हरॉक कंपनी, श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ, बॅरेक्‍स मोरारजी प्रा.लि., शिवसागर संस्था, पाटणकर विंड फार्म, मेसर्स टाटा फायनान्स, धन्वंतरी वनऔषधी संस्था, कोयना व्हॅली रिसॉर्ट, लेक व्ह्यु रिसॉर्ट, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पद्मावती विंड फार्म, सुझलॉन एनर्जी, बजाज इलेक्‍ट्रीकल, कोयना पर्यटन विकास सेवा मर्यादित यांच्यासह विनायक सुरेश भोसले व अतुल सुरेश भोसले यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत.

याबाबतचे सर्व पुरावे नुकतेच राज्याचे मुख्यवनसंरक्षक यांना सादर केले आहेत. त्यामुळे बेकायदेशीररित्या व्यवहार करणाऱ्यांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्याचबरोबर अभयरण्यात झालेली अतिक्रमणे तात्काळ पाडण्यात यावीत अन्यथा 15 दिवसानंतर हजारो कार्यकर्त्यांसह आम्ही अभयरण्यात प्रवेश करणार आहोत. त्यावेळी प्रशासनाने पोलीस पाठवू नयेत, असा इशारा पाटणकर यांनी दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here