अकोले, (प्रतिनिधी): – महसुल विभागांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक दाखले वेळेत उपलब्ध व्हावेत, त्याचबरोबर पिक पाहणी, फेरफार, सातबारा उतारे, वारस नोंद लवकरात लवकर व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
महसूल विभागातील विविध लोककल्याणकारी योजना या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा कराराचा उद्देश आहे. याचेच पुढेच पाऊल म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करणेसाठी प्रायोगिक तत्वावर मान्यता दिल्याची माहिती प्राचार्य डॉ.भास्कर शेळके यांनी दिली.
दि.२३ मार्च रोजी महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्राचे (सेतू) उद्घाटन माजीमंत्री तथा अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विजय खरे यांचेहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
सेतू केंद्रांतर्गत तहसीलमधून देण्यात येणार्या ई-पिक पाहणीसारख्या अनेक योजना, लक्ष्मीमुक्ती योजना, ऑनलाईन सेवा व दाखले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकाप्रमाणे वितरीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांसाठी बाहेरील सेतू कार्यालये, तहसिल कार्यालयात जाण्याची आवश्यकता असणार नाही.