पुणे – विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता धोका पत्करून स्टार्टअप सुरू करावे. सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक आव्हानांचा सामना करावा, असा सल्ला भारतीय जी 20 चे शेरपा व प्रशासकीय अधिकारी अभिताभ कांत यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा पाचवा दीक्षांत समारंभ पार पाडला. यावेळी विद्यापीठाच्या 5180 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, अमिताभ कांत व कार्याध्यक्ष राहुल कराड यांच्या हस्ते “एमआयटी डब्ल्यूपीयू विज्ञान महर्षी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.
सन्मानपत्र, सरस्वतीची मूर्ती व 5 लक्ष रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, कुलगुरु डॉ. आर. एम. चिटणीस, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. शक्ती मुरूगेसनर उपस्थित होते.
अभिताभ कांत म्हणाले, देश कॅशलेस आणि पेपरलेस होत असतांना डिजिटल पेमेंटच्या संख्येत वृद्धी होत आहे. एआयचा उपयोग मिलेट्री, पोलिस, ऑटोनॉमिक, शेतीबरोबरच अन्य क्षेत्रातही होत आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, विज्ञानाशिवाय प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे सतत संशोधन करत रहावे. विद्यार्थ्यांनी लक्ष्य मोठे ठेवावे.आपले ध्येय साध्य करण्याची मर्यादा ठेवू नये.