पुणे – विद्यार्थ्यांनी गुणवत्तापुर्ण संशोधन करण्याची गरज आहे. संशोधनामुळे भविष्यकालीन विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल, असे मत डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पांडकर यांनी व्यक्त केले आहे.
येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य, इतिहास आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय संशोधन कार्यपद्धती या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पांडकर हे अध्यक्षस्थानी होते.
प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे डॉ. प्रतीक शिंदे यांनी संशोधन अहवाल या विषयावर व्याख्यान दिले. एस.एन.बी.पी. च्या ए.सी.एस. महाविद्यालयाचे डॉ. विनीत रोकडे यांनी संशोधन प्रस्ताव कसा तयार करावा या विषयावर मार्गदर्शन केले. विंझर येथील अमृतेश्वर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. बाळासाहेब केंदळे यांनी संशोधन पद्धतीवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंजुळा खोपडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. बाळू जगताप यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.श्रेयसी परब यांनी करुन दिला. आभार प्रा. शिवाजी मोटेगावकर यांनी मानले.