कात्रज – कोंढव्यातील फ्लॅट विनाभाडेकरार दहशतवाद्यांना भाडेतत्वावर दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने भाडे कराराचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. कोंढव्यालगतच्या कात्रज, धनकवडी, सहकारनगर परिसरातील फ्लॅट तसेच व्यावसायिक गाळे मालकांना याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक शब्दांत तंबी देत ऑनलाइन भाडेकराराची प्रत पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याची सूचना केली आहे. फ्लॅट विनाभाडेकरार दिलेला असल्यास संबंधीत मालकावर कडक कारवाईची पूर्व सूचनाही भारती विद्यापीठ आणि सहकार नगर पोलीस ठाण्याकडून करण्यात आली आहे.
कोंढवा येथे दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर भाडेकरूंच्या माहितीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून अनेक मिळकतदार भाडेकरार करत नाहीत. त्यामुळे अनेक गुन्हेगारांनी अशा ठिकाणी आश्रय घेत असल्याचे समोर आले आहे. याबाबत दक्षिण पुणे उपनगर भागातील सोसायटीमधील फ्लॅट मालक व मिळकतदार यासंदर्भात भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिसांनी कडक भूमिका घेत भाडेकरारासह भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस ठाण्याकडून दिलेल्या नमुना अर्जासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट आदींसह रजिस्टर भाडेकरारनाम्याची कागदपत्रे पोलीस ठाण्यात जमा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
फ्लॅट किंवा व्यापारी गाळे भाडेतत्वावर देताना भाडेकरूची संपूर्ण चौकशी करूनच चौकस बुद्धीने भाडेकरू ठेवावेत त्यांची मूळ कागदपत्रे तपासून घ्यावीत. अन्यथा त्याचा नाहक त्रास फ्लॅट मालकास होऊ शकतो. – विजय कुंभार, पोलीस निरिक्षक, भारती विद्यापीठ पोलीस चौकी
पोलीस स्टेशन हद्दीतील घरमालक, मिळकतदार यांना भाडे करार व भाडेकरू यांच्या संदर्भात मूळ कागदपत्र असल्याशिवाय घर, फ्लॅट, गाडी भाड्याने देऊ नये व माहिती योग्य प्रकारे संकलित करावी. हे बंधनकारक आहे. – सुरेंद्र माळले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस ठाणे