कात्रज – कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी टीडीआर अन्यथा रोख मोबदला देत जागा ताब्यात घेऊन रुंदीकरणाच्या कामास गती द्यावी. आवश्यक त्या जागा दोन दिवसांत ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मार्च 2024 अखेर पर्यंत काम पूर्ण करण्याच्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला. आयुक्तांच्या दौऱ्याने महापालिका प्रशासन “ऍक्शन मोड’मध्ये आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
राजस सोसायटी चौक, माऊलीनगर, शत्रुंजय मंदिर चौक आदी महत्वाच्या ठिकाणी आयुक्त विक्रम कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाहणी करीत कामाची स्थिती तसेच जागा हस्तांतरणबाबत माहिती घेतली. यावेळी अनेक जागा मालकांशी त्यांनी थेट संवाद साधला.
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण कामाचे शत्रूंजय चौक ते टिळेकरनगर, टिळेकरनगर ते खडी मशीन व शत्रूंजय चौक ते राजस सोसायटी चौक, असे तीन टप्पे करण्यात आले आहेत.
पहिल्या टप्यातील जागा ताब्यात आल्या आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील जागांसाठी पुढील चार ते पाच दिवसांत संबंधित जागांमालकांसोबत बैठका घेऊन 50 मीटरच्या अखत्यारित येणाऱ्या जागा ताब्यात घेण्यात येतील, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. पुढील तीन महिने ठेकेदाराला काम करता येईल एवढ्या जागा ताब्यात आल्या आहेत. यावेळी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथविभाग प्रमुख व्ही जी कुलकर्णी, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी नगरसेवक प्रकाश कदम, प्रतिक कदम, राजाभाऊ कदम, व्यंकोजी खोपडे, महेश धूत यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यामुळे कात्रज-कोंढवा रस्ता कामाला गती येईङ. पुढील काही दिवसांत 50 मीटर अखत्यारित येणाऱ्या प्रत्येक जागामालकांशी बोलून तोडगा काढण्यात येईल. रस्त्यात येणारे वीजेचे खांब निविदा प्रक्रिया राबवून तत्काळ हटविण्यात येतील. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही. – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
280 कोटी भूसंपादनासाठी…
राज्यसरकारकडून आलेले 200 कोटी व महापालिकेचे 80 कोटी रुपये असे एकूण 280 कोटी रुपये रोख भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. या निधीतून 50 मीटर रस्त्याच्या भूसंपादनाचे काम पूर्ण होईल. मार्च 2024 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.