पुणे – ससून रूग्णालयातील परिचारिकांनी जुन्या पेन्शन योजना, रिक्त पदे यासह विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले. त्याचा फटका रूग्णसेवेवर झाला. मात्र, सायंकाळी आंदोलन मागे घेतल्यानंतर रूग्णालयातील रूग्णसेवा सुरळीत सुरू झाली.
परिचारिकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्तपदे भरावी, खासगीकरण रद्द करावे, अनुकंप तत्वावरील नियुक्ती विनाशर्त करावी, निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, वेतन त्रुटीमधील अन्याय दुर करावा असा विविध विविध मागण्यांसाठी पुणे जिल्ह्यातील राज्य सरकारी परिचारिका संघटनेच्या वतीने गुरूवारी (दि.14) सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केले. यावेळी ससून रूग्णालयातील परिचारिकांनी घोषणाबाजी देत, आंदोलन केले.
यावेळी सर्व परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्यामुळे वाॅर्ड, शस्त्रक्रिया विभागात रूग्णांची हेळसांड झाली. निवासी डाॅक्टरांच्या मदतीने काम सुरू ठेवावे लागले. एकंदरीत रुग्णसेवेवर आंदोलनाचा परिणाम झाला. मात्र, संघटनेच्या मागण्याबाबत सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर संध्याकाळी आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर कोलमडलेली रूग्णसेवा सुरळीत सुरू झाली. संघटनेच्या अध्यक्षा रेखा थिटे, माधुरी ओंबाळे, प्रज्ञा गायकवाड, सुरेखा शेलार, अरुणा गायकवाड, प्रियांका जाघव, संदीप लंगडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
“विविध मागण्यांसाठी सकाळपासून कामबंद आंदोलन करण्यात आले. मात्र, हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेऊ असे अश्वासन दिले. त्यामुळे संघटनेकडून आलेल्या सूचनेनुसार आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.” – रेखा थिटे – अध्यक्ष राज्य सरकारी परिचारिका संघटना, पुणे जिल्हा