मुंबई – राज्यातील निवासी डॉक्टरांचे वेतन वेळेत मिळत नसल्याने १० तारखेच्या आत पगार तसेच विद्या वेतनमध्ये १० हजार रुपये वाढ करण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येईल, आदी आश्वासन सरकारकडून देण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे.
निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह ठराविक तारखेला नियमित विद्यावेतन, वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. नवीन हॉस्टेलच्या संदर्भामध्ये संचालक, आयुक्त यांना निर्णय देण्यात आला आहे. नवीन होस्टेल आणि दुरुस्तीसाठी त्वरित ८० कोटी रुपये दिले आहेत, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
यानंतर आम्ही ७ ते १० दिवसांची वाट पाहू. मात्र, त्यानंतर जर सर्व मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची भूमिका स्पष्ट करु, असा इशारा राज्यातील निवासी डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. संप मागे घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली.
बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, तसेच सेंट्रल मार्ड संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.