इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये उद्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी देशभर कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तब्बल साडे ६ लाख सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. देशभरात १२.८५ कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
निवडणुकांमध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने हिंसक कारवाया होँण्याची शक्यता लक्षात घेऊन देशभर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये पोलीस, नागरी सशस्त्र दल आणि सशस्त्र दलांचे कर्मचारी समाविष्ट आहेत.
नियोजनानुसार मतदान सकाळी ८ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ५ वाजता संपेल. राष्ट्रीय संसदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ५,१२१ उमेदवार उतरले असून त्यामध्ये ४,८०७ पुरुष आणि ३१२ महिला उमेदवार आहेत.
चार प्रांतीय विधानसभांसाठी १२,६९५ उमेदवार रिंगणात आहेत, त्यात १२,१२३ पुरुष, ५७० महिला आणि दोन तृतीयपंथीय देखील आहेत.
देशातील सर्व निवडणूक मतदान केंद्रांवर मतपत्रिका आणि मतदानविषयक अन्य साहित्य घेऊन निवडणूक प्रतिनिधी आणि कर्मचारी रवाना झाले आहेत.
निवडणूक आयोगाने देशभरातील सुमारे 260 दशलक्ष मतपत्रिका आधीच जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना वितरित केल्या आहेत. मतदारांना मतदान ओळखपत्रे देखील दिली गेली आहे.
निवडणुकीच्या ठिकाणी हिंसक घटना घडू नये यासाठी उद्या अनेक ठिकाणचे इंटरनेट स्थगित केले जाण्याची अफवा पसरली होती. मात्र पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ॲथोरिटीने ही अफवा फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाने देशभरात ९ लाख ७ हजार मतदान केंद्रे उभी केली आहेत.
अतिरेकी गटांच्या हल्ल्यांच्या धोक्यामुळे सुरक्षा देण्यासाठी पोलिस, निमलष्करी दलाचे कर्मचारी आणि नियमित सैन्य दलाच्या तैनातीसह विस्तृत सुरक्षा उपाय करण्यात आले आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या ४,१७८ आहे, तर प्रांतातील संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या ५,९२५ आहे.
सर्वाधिक मतदार पंजाब प्रांतात…
पंजाब प्रांतात सर्वाधिक ७ कोटी ३२ लाख मतदार आहेत. त्यापाठोपाठ सिंध प्रांतात २ कोटी ६९ लाख, खैबर पख्तुनख्वा प्रांतात २ कोटी १९ लाख आणि बलुचिस्तान प्रांतात ५३ लाख ७१ हजार मतदार आहेत. राष्ट्रीय राजधानी इस्लामाबादमध्ये १० लाख ८३ हजार मतदार आहेत.