नगर – नगर शहरातील 36 ठिकाणांची जातनिहाय ओळख मिटवून त्यांना नवी नावे निश्चित करण्यात आली आहेत. या गल्ली व रस्त्यांना आता संत व महापुरुषांची नावे देण्यात आली आहे. लवकरच महापालिका नव्याने देण्यात आलेल्या नावाची अधिसूचना काढणार असून त्यानंतर या गल्ली व रस्त्यांची नव्या नावानेच ओळख निर्माण होणार आहे.
या नावांना आयुक्त पंकज जावळे यांनी मंजुरी दिली. माहितीसाठी महासभेकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. व्यवसाय अथवा इतर कारणांमुळे अनेक ठिकाणी विविध जातसमूह पूर्वापारपासून वसले आहेत. त्या परिसराचा जसजसा विकास झाला, तसा तो परिसर तेथे वस्ती करून राहणाऱ्या मोठ्या जात समूहांच्या नावाने ओळखला गेला. नगरमध्ये ब्राह्मणगल्ली, भिल्ल वस्ती, शिंपी गल्ली, हरिजन वस्ती, गवळीवाडा, माळीवाडा, खाटीक गल्ली असे अनेक जात समूहाने ओळखले जाणारे परिसर आहेत. या सर्व भागांचे नवे नामकरण करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी नगर शहरात होणार आहे. नगरमधील अशा 36 ठिकाणांची नावे निवडण्यात आली.
महापालिकेने यादी प्रसिद्ध करून नामकरण करण्यासाठी नवीन नावे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार केवळ 10 ठिकाणी नवी नावे सुचवण्यात आली. तर एका ठिकाणचे नाव बदलू नये, अशी मागणी झाली. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने यावर चर्चा, विचारविनिमय करून नव्या 36 नावांचा प्रस्ताव आयुक्तांकडे दिला होता. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे.
या वसाहतींची नावे बदलली
1) ब्राह्मण कारंजा (ईदगाह मैदानाजवळ) – शनीगल्ली कारंजा, 2) ब्राह्मण गल्ली (माळीवाडा) – संत परशुराम गल्ली, 3) वडारवस्ती (सावेडी नाका) – बजरंग वस्ती, 4) वैदूवाडी (सावेडी) – बजरंग वाडी, 5) शिंपी गल्ली (सहकारनगर)- संत नामदेव गल्ली, 6) तेलीखुंट- श्री संत संताजी महाराज पथ, 7) मोचीगल्ली (तोफखाना)- संत शिरोमणी रविदासजी नगर, 8) मोचीगल्ली (कापडबाजार)- संत गुरू रोहिदास गल्ली, 9) कुंभारगल्ली (नालेगाव) – श्री संत गोरोबा काका गल्ली, 10) खाटीक गल्ली (पांचपीर चावडी) – डॉ.अब्दुल कलाम आझाद मोहल्ला, 11) हरिजन वस्ती (सिद्धार्थनगर) – रमाबाई आंबेडकर वस्ती, 12) बौद्धवस्ती (सिद्धार्थनगर) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्ती, 13) हरिजन वस्ती (माळीवाडा)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर
14) ढोरवस्ती (भवानीनगर)- आनंदनगर, 15) हरिजन वस्ती (केडगाव)- पंचशीलनगर, 16) गवळीवाडा (सिव्हील हॉस्पिटलजवळ)- बाल ब्रह्मचारी सदगुरू महादू आप्पा नगर, 17) माळीवाडा – महात्मा फुले नगर, 18) कसाईगल्ली (झेंडीगेट)- व्यापारी मोहल्ला, 19) खाटीक गल्ली (माळीवाडा)- शरीफगल्ली, 21) वडारवस्ती (केडगाव)- बजरंग नगर, 21) काळू बागवान गल्ली- कालू भाई गल्ली, 22) ख्रिश्चन कॉलनी (तारकपूर)- तारकपूर कॉलनी, 23) सिंधी कॉलनी (तारकपूर) – संत कंवरराम नगर, 24) वाणीनगर – महाकाली नगर, 25) धनगरगल्ली – संत बाळूमामा गल्ली, 26) वंजार गल्ली – संत भगवानबाबा गल्ली
27) पीरशाह गल्ली- पीरशाह गल्ली, 28) ढोरवस्ती (बालिकाश्रम शाळेजवळ) – महालक्ष्मी वस्ती, 29) कुंभारगल्ली (बागडपट्टी) – संत गोरोबा गल्ली, 30) परदेशी गल्ली – महाराणा प्रताप गल्ली, 31) ख्रीस्त गल्ली – संभवनाथ गल्ली, 32) मिसगर चाळ – सिव्हील हॉस्पिटल चाळ, 33) बुरुडगल्ली – बांबू गल्ली, 34) सिंधी कॉलनी (भुतकरवाडीजवळ)-संत झुलेलाल कॉलनी, 35) मराठानगर (केडगाव) – छत्रपती संभाजी महाराज नगर, 36) गुजरगल्ली – श्री स्वामी समर्थ मार्ग.