मुख्याध्यापकासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
राहुरी – राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कुल मधील विद्यार्थिनीवर कर्मचाऱ्यांकडून सतत घडलेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करावे, आरोपीला मोकाट सोडून पाठीशी घालणाऱ्या मुख्याध्यापक व पदाधिकाऱ्यांना सहआरोपी करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले जयंती दिनाच्या दिवशी राहुरी बसस्थानकासमोर नगर- मनमाड महामार्गावर प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम करून आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महामार्गावर अर्धा ते पाऊण तास कार्यक्रम चालला. अद्याप आरोपी अटक नसल्याने विद्यार्थी व नागरिक आक्रमक झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडी, एकलव्य फाउंडेशन, वीर महाराष्ट्र सेना, श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादि, महिला संघर्ष समिती, आदिवासी ठाकर ठाकूर नोकरदार उत्कर्ष संस्था, बहुजन मुक्ती पार्टी, महाराष्ट्र राज्य, शाखा यांनी विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जर आरोपी आणि संस्थेच्या पदाधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर जिल्ह्यातील विद्यार्थी आक्रमक होतील, असा इशारा विद्रोही विद्यार्थी संघटनेचे सागर दोंदे यांनी दिली. गेल्या चार महिन्यांपूर्वी घडलेल्या अत्याचार प्रकरणी अद्याप आरोपीला अटक नाही. या आरोपीला आणि संस्थेतील पदाधिकाऱ्यांना नेमका कोणाचा हात आहे, असे प्रश्न निर्माण होत असल्याचे मत डॉ. जालिंदर घिगे यांनी व्यक्त केले.
उत्तम बर्डे, कांतीलाल जगधने, बाबुराव मकासरे, संजय संसारे, अनिलराव जाधव, वर्षाताई बाचकर, इम्रानभाई देशमुख, नामदेव पवार, बाळकृष्ण गांडाळ, रवींद्र मेंगाळ, विलास साळवे यांनी संतप्त प्रतिक्रिया आपल्या भाषणातून व्यक्त केल्या. यावेळी सागर दोंदे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या कार्यावरील गीताने शाहिरी सादर केली. संदीप कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले तर कुमार भिंगारे यांनी सर्वांचे आभार मानले.
आंदोलनाला सुनील गुलदगड, विकास लेंभे, विनोद डमाळे, गणेश कोरडे, निलेश जगधने, मंदाबाई बर्डे, भागवत बर्डे, संदीप गवळी, संतोष वाघमारे, मधुकर विधाटे, कॉ. ज्ञानेश गायकवाड, शशिकांत बांडे, खंडू नाडेकर, मिलिंद कोंडार, पांडुरंग धिंदले, राहुल शिंदे, भास्कर आयनर, विशाल बुलाखे, महेश बाचकर, वैभव लांडगे, अविनाश गुंजाळ, किरण धसाळ, संतोष जाधव, राम साळुंके, गोरक्ष तमनर, पंकज थोरात, संदीप त्रिभुवन यांसह शेकडो विद्यार्थी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.