अकोले -टोमॅटो पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही जण अफवा पसरवत आहेत.त्यामुळे अफवा पसरवणे तातडीने थांबवावे. अन्यथा माकप किसान सभा संबंधितांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घेईल, असा इशारा किसान सभेचे प्रांतिकचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.
डॉ. नवले म्हणाले, वनस्पतीबाधक विषाणू व प्राणीबाधक विषाणू या संपूर्ण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. वनस्पती किंवा टोमॅटोला बाधित करणाऱ्या विषाणूमुळे माणसे आजारी पडण्याची घटना समोर आलेली नाही. टोमॅटोवर आलेल्या विषाणूमुळे माणसे आजारी पडल्याची बाब कोठेही घडलेली नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणे कायदेशीर गुन्हा आहे. संबंधितांनी ही बाब लक्षात घेऊन या बाबतच्या अफवा पसरवणे तातडीने थांबवावे, असे डॉ. नवले म्हणाले. टोमॅटो पिकावर आलेल्या विषाणूची ओळख पटविण्यासाठी कृषी विभागाने काम सुरू केले आहे. बाधित झाडांचे नमुने बंगळुरू येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसांत याबाबत निदान होईल.
हे निष्कर्षांची माहिती तातडीने सार्वत्रिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असेही ते म्हणाले. अफवा पसरविण्यासाठी शेतकरी कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर असलेले व्हिडिओ एडिट करून तयार बनावट क्लीप प्रचारासाठी वापरल्या जात आहेत, असे सांगून हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत, अन्यथा त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा डॉ. नवले यांच्यासह माकप पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे आदींनीही दिला आहे. केले आहे.