जीनिव्हा – करोनावर रामबाण उपाय ठरेल अशी लस तयार करण्याचे प्रयत्न सध्या अनेक देशांमध्ये सुरु आहेत. मात्र, आरोग्याच्या प्रश्नाबाबतही काही विकसित देशांमध्ये कुरघोडीचे राजकारण होत असल्याचे दिसत असून ते थांबवा व जनतेसाठी एकत्र या, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) केले आहे.
रशियाने या लसीसाठी संशोधन सुरु केले व पहिली लस तयार केल्याचा दावा केला होता. त्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त करत अशी लस खरेच तयार झाली का ते तपासावे असे सांगून आपल्याला अद्याप लस तयार करता आली नसल्याचा कमीपणा झाकण्याचा प्रयत्न केला होता. रशियानंतर चीननेही लस निर्माण केली व त्याचे पेटंटही एका कंपनीला बहाल केले त्यावरुनही सध्या अमेरिका, चीन, रशिया व आखातातील काही देशांमध्ये बेबनाव निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
जागतिक स्तरावर करोनाचा धोका असताना एकत्र येत सहकार्याच्या भावनेतून संपूर्ण जगाला या धोक्यातून बाहेर काढण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे मात्र, तसे दिसत नसून केवळ आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. ज्या गोष्टी मानवी आरोग्यसाठी अत्यंत आवश्यक आहेत निदान त्यात तरी राजकारण आणले जाऊ नये, असेही आवाहन संघटनेने केले आहे.
विकसनशील देशांतही सध्या याबाबत संशोधन सुरु असून त्याबाबतची माहिती संघटनेला येत्या 31 ऑगस्टपूर्वी द्यावी असेही सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही देशाचे याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, काही देश माध्यमांना ही माहिती देत आहेत, मग संघटनेला ही माहिती का दिली जात नाही, असा आक्षेपही संघटनेने व्यक्त केला.
युरोपीयन युनियन, ब्रिटन, स्वित्झर्लंड आणि अमेरिकेने करोना लसीसंदर्भात जगातील मोठ्या कंपन्यांबरोबर करार करण्याची तयारी दर्शवली आहे. रशिया आणि चीनही करोनाची लस निर्माण करण्यासंदर्भातील प्रयत्न सुरु आहेत. मात्र लस निर्माण झाल्यानंतर देशाला प्राधान्य दिल्याने जागतिक स्तरावर करोनाविरुद्धच्या लढ्याला फटका बसेल, असेही संघटनेने म्हटले आहे.