मुंबई – कच्च्या तेलाचे दर 110 डॉलरवर असताना युरोप रशियावर कच्च्या तेलाच्या विक्रीबाबत निर्बंध घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतामध्ये मोठा प्रमाणात खरेदी करणाऱ्यासाठी डिझेलचे दर 25 रुपये प्रति लिटरने वाढविण्यात आले आहेत. या कारणामुळे शेअर बाजारात सोमवारी मोठ्या प्रमाणात विक्री होऊन निर्देशांक कोसळले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 571 अंकांनी कोसळून 57,292 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 169 अंकांनी कोसळून 17,117 अंकांवर बंद झाला.
तेल शुद्धीकरण कंपन्यांबरोबरच बॅंका, ग्राहक वस्तू कंपन्या आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे निर्देशांक कोसळले. पावर ग्रिड, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले, कोटक बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही घट झाली. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांनाही विक्रीचा मारा सहन करावा लागला.
सन फार्मा, एचडीएफसी बॅंक, मारुती, टायटन या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. जिओजी वित्तीय सेवा या कंपनीचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की रशिया- युक्रेन युद्ध वाढत जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत.
भारतातही मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्यासाठी डिझेलचे दर वाढविण्यात आल्यामुळे गुंतवणूकदार बिथरले आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यात काही प्रमाणात खरेदी केली आहे. त्यांनी खरेदी चालूच ठेवली तर निर्देशांकाला थोडाफार आधार मिळेल. दरम्यानच्या काळामध्ये क्रुडचे दर 110 डॉलरवर गेले आहेत.