मुंबई – जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येत असल्यामुळे कालच्या प्रमाणेच आजही बाजार बंद होताना बरीच विक्री झाली. मात्र तरीही शेअर बाजार (Stock Market) निर्देशांक कालच्या तुलनेत काही प्रमाणात वाढून बंद झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 59 अंकांनी वाढून 58,833 अंकावर बंद झाला (Sensex rose 59 points to close at 58,833). राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 36 अंकांनी म्हणजे 0.21 टक्क्यांनी वाढून 17,558 अंकावर बंद झाला.
एनटीपीसी, टायटन, पावर ग्रीड, कोटक महिंद्रा बॅंक, लार्सन अँड ट्यूब्रो, कोटक महिंद्रा बॅंक, टाटा स्टील आणि महिंद्रा कंपनीच्या शेअरच्या भावात आज वाढ झाली. तर इंडसइंड बॅंक, एचडीएफसी, एशियन पेंट्स आणि भारतीय एअरटेल या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
अमेरिकेत वाढलेली महागाई कमी करण्यासाठी भविष्यात काय करण्याचा विचार आहे, यासंदर्भात फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पावेल वक्तव्य करण्याची शक्यता आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे कालपासून लक्ष लागले आहे. त्यामुळे अमेरिका आणि युरोपातील शेअर बाजारातही संमिश्र वातावरण होते.
दरम्यानच्या काळात भारतासंबंधात घडलेली एक नकारात्मक बाब म्हणजे कालपासून कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. आजही कच्च्या तेलाच्या किमती वाढवून 100 डॉलर पेक्षा जास्त पातळीवर राहिल्या. दरम्यान जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण असले तरी काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी 369 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार खरेदी करीत असतानाच देशातील संस्थागत गुंतवणूकदार मात्र विक्री करून नफा काढून घेत असल्याचे वातावरण या महिन्यात निर्माण झाले आहे. (Stock Market: Slight rise in share indices; Sensex rose 59 points to close at 58,833)