मुंबई – अमेरिका आक्रमक व्याज दरवाढ करणार असल्यामुळे अमेरिकेसह जगातील इतर शेअर बाजाराचे निर्देशांक सोमवारी कोसळले. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांकही दीड टक्क्यांनी कोसळल्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य एकाच दिवसात 2.39 लाख कोटी रुपयांनी कमी झाले असल्याचे दिसून आले.
अमेरिकेत व्याजदर वाढ झाल्यानंतर अमेरिकेत केलेली गुंतवणूक फायद्यात ठरणार आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूक केलेले परदेशी संस्थागत गुंतवणूकदार परत अमेरिकेत गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय निर्देशांकावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे सोमवारी मोठ्या प्रमाणात विक्री झाली. भारताबरोबरच या विक्रीचा फटका इतर वेगाने विकसित होणाऱ्या देशांनाही बसला आहे.
सोमवारी सायंकाळी शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 2.39 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 274 लाख कोटी रुपये झाले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात जवळ 18% इतके गुंतवणूक आहे. हे गुंतवणूकदार परत चालले तर त्याचा देशातील गुंतवणूकदारावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 51 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. अमेरिकेच्या पतधोरण समितीची बैठक आता सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत या समितीची बैठक होत नाही आणि नेमकी व्याजदरवाढ किती प्रमाणात केली जाईल हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत शेअर बाजारामध्ये अस्थिरता रेंगाळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भारताची अर्थव्यवस्था बळकट
दरम्यान भारताची अर्थव्यवस्था बळकट आहे. 31 ऑगस्ट रोजी पहिल्या तिमाहीच्या राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जाहीर होणार आहे, राष्ट्रीय उत्पन्न 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये वाहन विक्रीची आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्सची माहिती जाहीर होणार आहे. याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार असल्याचे सांगण्यात येते.