मुंबई – अमेरिकेमध्ये काही काळ मंदी आली तरी हरकत नाही मात्र आक्रमक व्याजदर वाढ करून महागाईला पाय बंद घालणारच असे वक्तव्य अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जेरोम पावेल यांनी शुक्रवारी केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे अमेरिकेसह जगातील शेअर बाजारात (stock market) सोमवारी जोरदार विक्री झाली.
भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांकही जवळ जवळ दीड टक्क्यांनी कोसळले बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 861 अंकांनी कोसळून 57,972 अंकावर बदल झाला. एक वेळ सेन्सेक्स 1,466 अंकांनी कोसळला होता. मात्र नंतर काही खरेदी झाल्यामुळे निर्देशांकात थोडीफार सुधारणा झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 246 अंकांनी म्हणजे 1.40 टक्क्यांनी कोसळून 17,312 अंकावर बंद झाला. रुपया कोसळल्याचा आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याचाही शेअर बाजारावर परिणाम झाला.
टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, कोटक महिंद्रा बॅंक, टाटा स्टील, ऍक्सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया या कंपन्यांना विक्रीचा फटका बसला. मात्र अशा परिस्थितीत मारुती, नेस्ले, एशियन पेंटस, महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरचा भाव 0.84 टक्क्यांनी कमी झाला. मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप 0.80 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 0.75 टक्क्यांनी कोसळला. माहिती तंत्रज्ञान, बॅंकिंग, वित्त, धातू, रिऍलिटी या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरचे भाव कोसळले. तर उर्जा, ग्राहक वस्तू, तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्राचे निर्देशांक वाढले.
अमेरिकेतील मंदीच्या शक्यतेमुळे डॉलर वधारला. अमेरिकेसह विविध देशाच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हप्रमाणे युरोपच्या सेंट्रल बॅंकेने मंदी आली तरी चालेल मात्र महागाई कमी करण्याची गरज व्यक्त केली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात विक्री चालूच ठेवली तर आगामी काळातही शेअर बाजार निर्देशांक काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. (Strong sell-off in world stock markets, including the US; Stock indices crash, investors suffer huge losses)