मुंबई – रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या शक्यतेमुळे जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजार निर्देशांक काल कोसळले होते. मात्र रशियाने लष्करी कवायती थांबल्यामुळे जागतिक शेअर बाजारातील वातावरण निवळले. त्याचबरोबर काही चाणाक्ष गुंतवणूकदारांनी सध्याच्या परिस्थितीतील खरेदी नफादायक करण्याच्या शक्यतेमुळे जोरदार खरेदी केल्यामुळे निर्देशांकाची काल झालेली झीज भरून निघाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,736 अंकांनी म्हणजे 3.08 टक्क्यांनी उसळून 58,142 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 509 अंकांनी वाढून 17,352 अंकांवर बंद झाला. युक्रेन संदर्भातील तणाव निवळल्यामुळे आज डॉलर कमकुवत होऊन रुपयाचा दर वाढला. त्याचबरोबर क्रुडचे दर काही प्रमाणात कमी झाले.
त्यामुळे शेअर बाजारात जोरदार खरेदी झाल्याचे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. मात्र महागाई 6 टक्क्यांच्या वर गेली आहे. हा गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे. आज झालेल्या जोरदार खरेदीमुळे मुंबई शेअर बाजारातील सर्व 19 क्षेत्राचे निर्देशांक वाढले. त्यामध्ये वाहन, बॅंकीग, तंत्रज्ञान, रिऍल्टी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा समावेश होता. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये तीन टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. दुपारच्या सत्रामध्ये युरोपातील शेअर बाजाराचा निर्देशांक वाढल्याचे दिसून आले.
अस्थिरता संपलेली नाही
आज शेअर बाजार निर्देशांकामध्ये तीन टक्क्यापर्यंत वाढ झाली असली तरी जोपर्यंत युक्रेन मुद्यावरील मतभेद समाप्त होत नाहीत. तोपर्यंत जागतिक बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारातही अस्थिरता रेंगाळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भारताच्या दृष्टीकोनातून चिंतेची बाब म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री चालू आहे. काल या गुंतवणूकदारांनी 4,253 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.