नवी दिल्ली -एअर इंडियाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून टाटा समूहाने इल्कर आयसी नियुक्ती केली आहे.
एअर इंडिया बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इल्कर आयसी यांना विमान कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. ते तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्षही राहिले आहेत.
एअर इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्त झालेले इल्कर आयसी यांना विमान कंपन्यांमध्ये मोठ्या जबाबदारीसह नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. ते 51 वर्षांचे असून त्यांनी तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष म्हणून काम करताना मोठी भूमिका बजावली आहे. आयसी हे तुर्कीतील बिल्केंट विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि सार्वजनिक प्रशासन विभागाचे 1994 च्या बॅचचे विद्यार्थी होते.
आता इल्कर आयसींचे नाव मंजुरीसाठी नियामक मंडळाकडे पाठवले जाईल. बोर्डाच्या बैठकीत उपस्थित असलेले टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी आयसींच्या नियुक्तीबद्दल सांगितले की, इल्कर हे हवाई वाहतूक उद्योगाचे नेते आहेत ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात तुर्की एअरलाइन्सचे नेतृत्व केले. ते एअर इंडियाला नवीन उंचीवर नेतील, असेही ते म्हणाले. आयसी म्हणाले की,आम्ही आमचा अनुभव आणि एअर इंडियाचा मजबूत वारसा वापरून जगातील सर्वोत्तम विमानसेवा तयार करू. आयसी 1 एप्रिल 2022 पासून एअर इंडियामध्ये आपली जबाबदारी स्वीकारतील.