शेअर बाजार निर्देशांक कोसळले

दोन दिवसात 5.61 लाख कोटींचे नुकसान

मुंबई- गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून अर्थसंकल्पातील नकारात्मक तरतूदी आणि अमेरिका टाळणार असलेल्या व्याजदर कपातीमुळे जगाबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सोमवारी कोसळले. शुक्रवारीही निर्देशांक घसरले होते. त्यामुळे दोन दिवसात गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीचे मूल्य 5.61 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.

सोमवारी बाजार बंद होताना, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 792 अंकांनी म्हणजेच 2 टक्‍क्‍यांनी कोसळून 38,720 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 252 अंकांनी कोसळून 11,558 अंकांवर बंद झाला. त्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 3.39 लाख कोटी रुपयांनी नुकसान झाले. शुक्रवारी सेन्सेक्‍स 394 अंकांनी घसरला होता.
भांडवली वस्तू, रिऍल्टी, वाहन, उर्जा, वित्त, बॅंकिंग, तेल आणि नैसर्गिक वायू, धातू क्षेत्रासह सर्वच क्षेत्राचे निर्देशांक सोमवारी 3.78 टक्‍क्‍यांनी कमी झाले. त्याचबरोबर “मिड कॅप’ अणि “स्मॉल कॅप’ 2.46 टक्‍क्‍यांनी कोसळले.

केंद्रीय अर्थसंकल्पात कंपन्यांना त्यांचे किमान 35 टक्के भाग भांडवल जनतेला खुले करण्यास सांगितले आहे. कंपन्यांच्या “बायबॅक’वर 20 टक्के कर लावला जाणार आहे. अतिश्रीमंतांवरील प्राप्तीकराच्या अधिभारात वाढ करण्यात अली आहे. त्यातच अमेरिका या आठवड्यात रोजगाराच्या चांगल्या आकडेवारीमुळे व्याजदरात कपतीची शक्‍यता मावळली आहे. त्यामुळे देशातील अणि परदेशातील गुंतवणूकदारांनी तुफान विक्री केल्यामुळे निर्देशांक कोसळल्याचे पिलारा कॅपिटल या संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप केसवन यांनी सांगितले.

आज आशिया, युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजार निर्देशांकही कमी झाल्यामुळे निर्देशांकांना कसलाही आधार मिळाला नाही. मुंबई शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांपैकी 1,953 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर केवळ 571 कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. निर्देशांक कोसळल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 30 पैशांनी कमी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.