मुंबई – शेअर बाजारात मंगळवारी दिवसभर खरेदी-विक्रीच्या जोरदार लाटा आल्या. मात्र दिवसाअखेरीस निर्देशांकात बरीच वाढ होऊन निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर विराजमान झाले. आजच्या नेतृत्व एचडीएफसी, एअरटेल, टेक महिंद्रा, इन्फोसिस, कोटक बॅंक या कंपन्यांनी केले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 151 अंकांनी वाढून 54,554 या नव्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 21 अंकांनी वाढून 16,280 अंकांवर बंद झाला. मात्र आजच्या खरेदीच्या वातावरणातही टाटा स्टील, एनटीपीसी, आयटीसी, पॉवर ग्रीड या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
खासगी बॅंका आणि वित्तीय कंपन्या व माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. मात्र सरकारी बॅंका आणि रिऍल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाली.
मंगळवारी दूरसंचार, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान व बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक 2.07 टक्क्यांपर्यंत वाढले. धातू, रिऍल्टी क्षेत्राचे निर्देशांक 2.27 टक्क्यांपर्यंत कमी झाले. मुख्य निर्देशांक वाढले असले तरी छोट्या कंपन्यांच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोन टक्क्यांपर्यंत घसरले.
सध्या निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार कमालीचे सावध आहेत. त्यातच करोनाच्या केसेस जगातील काही भागात वाढत आहेत. त्यामुळे धातु क्षेत्रावर परिणाम झाला असल्याचे जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. त्याचबरोबर अमेरिका लवकरच व्याजदरातील सवलती कमी करण्याची शक्यता असल्याचे जागतिक बाजारात बोलले जाऊ लागले आहे. गेल्या काही महिन्यापासून मिड कॅप आणि स्मॉल कॅप वाढत होते. मात्र आता या क्षेत्रात विक्रीचे वारे निर्माण झाले आहे.