मुंबई – रशिया- युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात आगोदरच विक्रीचे वातावरण होते. आता अमेरिकेतील महागाई अजूनही विक्रमी पातळीवर असल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी तुफान विक्री होऊन निर्देशांक कोसळले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,158 अंकांनी कोसळून 52,930 या दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 2.22 टक्क्यांनी म्हणजे 359 अंकांनी कोसळून 15,808 अंकांवर बंद झाला.
अमेरिकेत एप्रिल महिन्यातील महागाई 8.3 टक्के नोंदली गेली आहे. ही महागाई 40 वर्षाच्या उच्चांकी पातळीवर आहे. अमेरिकेच्या डॉलरच्या माध्यमातून जागतिक पातळीवर व्यापार होतो. यासाठी अमेरिका महागाई रोखण्यासाठी आक्रमक व्याजदर वाढ करणे अपेक्षित आहे. त्यामुळे अमेरिकेसह युरोप, आशियाई देशांमधील शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी कोसळले. त्याचा संसर्ग भारतीय शेअर बाजारांना झाला.
अमेरिका केवळ व्याजदरात वाढ करणार नाही तर भांडवल सुलभतेत मोठ्या प्रमाणात घट करणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे तरी शेअर बाजारांमध्ये नकारात्मक वातावरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतामधील महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी गुरुवारी सायंकाळी जाहीर होणार होती. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करत असतानाच भारतातील गुंतवणूकदार एकतर विक्री करीत होते किंवा कुंपणावर बसून होते.
रुपया नव्या नीचांकी पातळीवर
अमेरिकेच्या आक्रमक व्याज दरवाढीमुळे डॉलर वधारत आहे. त्याचबरोबर भारतात चालू खात्यावरील तूट वाढत आहे. या कारणामुळे भारतात डॉलरची मागणी वाढून रुपयाच्या मूल्यात वेगाने घट होत आहे. गुरुवारी रुपयाचा भाव तब्बल 15 पैशांनी घटून रुपयाचा भाव 77 रुपये 40 पैसे प्रति डॉलर या नव्या निचांकी पातळीवर गेला. गेले दोन दिवस रिझर्व्ह बॅंक हस्तक्षेप करीत असल्यामुळे रुपयाचे मूल्य काही प्रमाणात सुधारण्यास मदत झाली होती. मात्र आज शेअर बाजार निर्देशांक कोसळल्यामुळे रुपयाला आधार मिळू शकला नाही असे विश्लेषकांनी सांगितले.