पुणे – स्पोर्टसफील्ड मॅनेजमेंट आयोजित पहिल्या इंद्राणी बालन विंटर टी-20 लीग अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने सलग सहावा विजय नोंदवित स्पर्धेत आगेकूच केली. पुणे सी. ए. संघाने पहिला विजय नोंदवित गुणांचे खाते उघडले.
मुंढवा येथील लिजंडस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या गटसाखळी फेरीत ऋतुराज वीरकर याच्या 57 धावांच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबचा 90 धावांनी पराभव करून आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. पुनित बालन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकामध्ये 7 गडी गमावून 211 धावांचे आव्हान उभे केले.
यामध्ये ऋतुराज वीरकर याने 57 धावांची खेळी केली. या शिवाय आतिश कुमार (नाबाद 31 धावा) व ओंकार खाटपे (27 धावा) यांनी संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला. यामध्ये ओंकार आणि ऋतराज यांच्यात दुसऱ्या गड्यासाठी 38 चेंडूत 85 धावांची झालेली भागिदारी निर्णायक ठरली. या आव्हानाला उत्तर देताना फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबचा डाव 20 षटकात 121 धावांवर आटोपला.
दुसऱ्या सामन्यात आनंद द्यामा याच्या अष्टपैलू खेळीमुळे पुणे सी.ए. संघाने फार्मा इलेव्हन संघाचा केवळ 19 धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुणे सी. ए. संघाने 19 षटकात 4 गडी गमावून 126 धावा जमविल्या. माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या फार्मा इलेव्हन संघाचे फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहून धावा जमवू शकले नाही. त्यांचे आव्हान 17.5 षटकामध्ये 107 धावांवर संपुष्टात आले.
संक्षिप्त धावफलक – गटसाखळी फेरी :
1) पुनित बालन ग्रुप : 20 षटकात 7 बाद 211 धावा. (ऋतुराज वीरकर 57, आतिश कुमार नाबाद 31, ओंकार खाटपे 27, श्रीनिवास सरवदे 3-22) वि. वि. फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब ः 20 षटकात 6 बाद 121 धावा. (सुदीप धरणगांवकर 40, सोहम सरवदे 23, अक्षय दरेकर 2-22). सामनावीर : ऋतुराज वीरकर.
2) पुणे सी. ए. संघ : 19 षटकात 4 बाद 126 धावा. (सौभम सोनी 41, रुद्रांग बी. 44, आनंद द्यामा नाबाद 23, अमोल लहासे 1-10) वि. वि. फार्मा इलेव्हन ः 17.5 षटकात सर्वबाद 107 धावा. (ऋषीकेश दळवी 19, दिपेश शेरे 14, सुहास कौलवार 3-22, साहील पारेख 3-15, आनंद द्यामा 3-22). सामनावीर : आनंद द्यामा.