पुणे -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जून-2023 मध्ये होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आयोगाने शुक्रवारी रात्री उशिरा पूर्व परीक्षेची तारीख प्रसिद्ध करत मुख्य परीक्षाही पहिल्यांदाच ऑनलाइनद्वारे होणार असल्याचे स्पष्ट केले. ऑनलाइन परीक्षामुळे निकालही वेळेतही लागण्याची चिन्हे आहेत.
नव्या अभ्यासक्रम लागू करण्यावरून सध्या स्वायत्त संस्था असलेली “एमपीएससी’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उमेदवारांच्या आंदोलानंतर नवा अभ्यासक्रम आणखी दोन वर्षांनी लागू करण्याचा निर्णय घेत आयोगाने उमेदवारांना दिलासा दिला आहे. त्यानंतर दि. 24 फेब्रुवारी रात्री 11 वाजता 673 पदांच्या भरती प्रक्रियेची जाहीरात प्रसिद्ध केली आणि परीक्षेच्या तारखाही जाहीर केल्या. त्यात राज्य सेवा मुख्य परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल, असेही आयोगाने नमूद केले आहे.
आयोगाने टप्प्याटप्प्याने सर्व परीक्षा ऑनलाइनद्वारे घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा ऑनलाइनद्वारे होण्यासाठी आयोगाचे यापूर्वीच टेंडर प्रक्रिया आणि कंपनीशी सामजंस्य करारही झाले आहेत. यापूर्वी सरळ सेवा भरतीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या. त्यानंतर सर्व यंत्रणेची खातरजमा झाल्यानंतर आयोगाने मुख्य परीक्षाही ऑनलाइनचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी राज्य सेवा मुख्य परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होत होती. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास वेळ जात होता. आता मात्र ऑनलाइन परीक्षांमुळे निकालाची प्रक्रिया गतीमान होण्याची शक्यता आहे. तसेच उमेदवारांना उत्तरेही तत्काळ ई-मेलद्वारे पाठविणे शक्य होणार आहे. त्यामुळे ऑनलाइन निकाल हा उमेदवारांना फायदेशीर ठरण्याची चिन्हे आहेत.
“ऑनलाइन’च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
सुमारे दोन-तीन लाखांहून अधिक परीक्षार्थी संख्या असलेल्या एमपीएससीच्या ऑनलाइन परीक्षेवर उमेदवारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यापूर्वी ऑनलाइन परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकाराचा उजेडात आला होता. लाखो उमेदवारांची एकाच वेळी ऑनलाइन परीक्षेसाठी आयोगाची यंत्रणा सक्षम आहे? परीक्षा पादर्शकता होईल, याविषयी उमेदवार साशंक आहेत.
दि. 4 जूनला एमपीएससी पूर्वपरीक्षा
आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा जाहीर केली. त्यानुसार पाच विभागांतील 673 पदांच्या भरती प्रक्रियेसाठी पूर्व परीक्षा 4 जून 2023 रोजी होणार आहे. त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा 7 ते 9 ऑक्टोबर, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि गट ब मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर, विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर, निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब मुख्य परीक्षा 21 ऑक्टोबर, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा गट ब मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबरला होणार आहे. या परीक्षेसाठी 2 ते 22 मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे.