‘आरटीई’ प्रवेशाची राज्यस्तरीय सोडत

दोन दिवसांत प्रवेशाच्या शाळेचे नाव समजणार

जागांच्या तुलनेत दुप्पट अर्ज


शाळांची संख्या
9, 195


1,16,865
प्रवेशाच्या जागा


2,44,951
एकूण प्राप्त अर्ज

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार “आरटीई’च्या 25 टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय सोडत काढण्यात आली. संगणकाद्वारे सर्व प्रक्रिया रन करण्यात येत असल्याने आता दोन दिवसांत पालकांना मोबाईलवर “एमएसएस’द्वारे मुलांचा कोणत्या शाळेत प्रवेश निश्‍चित झाला याची माहिती मिळणार आहे.

आझम कॅम्पसमधील हॉलमध्ये सोमवारी “आरटीई’ प्रवेशासाठी लहान मुलांच्या हस्ते बाऊलमधून चिठ्ठी काढत सोडत घेण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, पुणे महापालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी शिवाजी दौंडकर, सहायक प्रशासन अधिकारी एम.आर.जाधव, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, उपशिक्षणाधिकारी के.डी.भुजबळ, गीता जोशी आदी उपस्थित होते.

रहिवाशी पत्त्याच्या जवळच्या शाळेतच प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्वात आधी शाळेपासून 1 कि.मी.अंतरापर्यंतच्या पालकांच्या मुलांचा प्रवेशासाठी संधी मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 1 ते 3 कि.मी. पर्यंतच्या अंतरामधील मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. उर्वरित प्रवेशासाठी 3 कि.मी. अंतराच्या पुढील मुलांना संधी मिळणार आहे.

चूकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्द करण्यात येणार आहेत. लॉटरी लागल्यानंतर पोर्टलवरुन प्राप्त झालेल्या शाळेच्या नावाच्या वाटप पत्राची प्रिंट काढून पालकांनी दिलेल्या मुदतीत पडताळणी समितीकडून प्रवेशासाठीची सर्व कागदपत्रे तपासून घेणे आवश्‍यक आहे. त्यावर समितीची स्वाक्षरी व शिक्का घेतल्यानंतर पालकांनी समितीने दिलेली प्रवेशाची पावती जमा करुन प्रवेश घ्यावा लागणार आहे. एखाद्या शाळेने प्रवेश नाकारल्या त्याविरुद्ध शिक्षणाधिकारी व तक्रार निवारण समितीकडे पालकांना तक्रार नोंदवून न्याय मागता येणार आहे. मात्र सर्व प्रवेश प्रक्रिया ही मुदतीतच पूर्ण करावी लागणार आहे.

अशी काढली सोडत 
महमंदवाडी येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधील प्रवेशासाठी सर्वाधिक 3 हजार 212 अर्ज भरण्यात आले आहेत. येथील प्रवेश सोडत काढण्यासाठी एकूण 4 बाऊल ठेवण्यात आले होते. या प्रत्येक बाऊलबध्ये 0 ते 9 या क्रमांकाच्या चिठ्ठया टाकण्यात आल्या होत्या. लहान मुलांच्या हस्ते या चिठ्ठया काढण्यात आल्या. त्यातील क्रमांक संगणक प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहे. “एनआयसी’ मार्फत राबविण्यात येणाऱ्या संगणक प्रक्रियेद्वारे डेटा रन करण्यास सुरुवात करण्यात येणार असून ही रॅंडम प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 8 व 9 एप्रिल असा दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर 10 एप्रिलपासून पालकांना एसएमएसद्वारे प्रवेश अंतिम झालेल्या शाळांची नावे पालकांना समजणार आहेत.

पुण्यातील शाळांसाठी चढाओढ
पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा लागल्याचे चित्र पहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणच्या 963 शाळांमधील 16 हजार 593 प्रवेशाच्या जागांसाठी सर्वाधिक 53 हजार 676 अर्ज दाखल झाले आहेत.

कोणाला प्रवेश
वंचित व दुर्बल घटकांसाठी “आरटीई’अंतर्गत विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेशाच्या जागा रिक्त ठेवण्यात येतात. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना या शाळेत प्रवेश मिळतो.

सन 2012 पासून “आरटीई’ प्रवेशाला सुरूवात करण्यात आली. त्या वर्षी 9 हजार प्रवेश झाले. सन 2013-21 हजार, सन 2014 मध्ये 30 हजार 667, सन 2015 मध्ये 39 हजार, सन 2017 मध्ये 64 हजार याप्रमाणे विद्यार्थी प्रवेशांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. सन 2014 पासून प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धत राबविण्यास सुरुवात झाली आहे.
– दिनकर टेमकर, शिक्षण सहसंचालक.

Leave A Reply

Your email address will not be published.