आ. पृथ्वीराजबाबांचा प्रचाराचा धडाका

उदयनराजेंच्या प्रचारार्थ दक्षिणमध्ये मुंढे, गोटे, वारुंजी येथे जाहीर सभा

कराड – राफेल विमान प्रकरणात एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाला आहे. एवढा अफाट पैसा या निवडणुकीत उधळला जाणार आहे. पैसा फेकून माणसं खरेदी केली जातील. दुर्दैवाने पुन्हा मोदी सत्तेत आल्यास पुन्हा निवडणुका होणार नाहीत, लोकशाही राहणार नाही आणि या देशाची घटनाही राहणार नाही, असा गर्भित इशारा माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत दिला.

कराड तालुक्‍यातील मुंढे, गोटे, वारुंजी येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभांत आमदार चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील, निवासराव थोरात, शिवराज मोरे, जयंत पाटील, जि.प. सदस्या मंगलाताई गलांडे, विद्याताई थोरवडे, सुनील काटकर आदी प्रमुख उपस्थित होते.

आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोंदीच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात 45 वर्षांत कधी नव्हे इतके बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून हे केवळ मोदींचेच कर्तृत्व आहे. गुजरातप्रमाणे ते देश चालवायला निघाले आणि खड्ड्यात पडले.
महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. नरेगाची कामे करण्याची यांची दानत नाही. कारण सरकारकडे पैसाच नाही. केवळ राजकीयच नव्हे तर प्रशासकीय पातळीवरही त्यांना अपयश आले आहे. 15 बड्या उद्योगपतींची कर्जे यांनी माफ केली. मोदींना शेतकऱ्यांची कर्जे माफ करा म्हटले, तर म्हणतात सवय लागेल. यांच्याकडे उद्योगपतींना कर्जमाफी द्यायला पैसा आहे, अन्‌ शेतकऱ्यांना द्यायला कारणे सांगत आहेत.

मन की बात करणाऱ्या सरकारने मन की नव्हे तर केवळ “धन’ की बात केली, असा आरोप करुन श्री. छ. उदयनराजे म्हणाले, खोटी आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला लोकहिताची कामे करण्यावाचून कोणी रोखले होते. त्यांच्याकडे केवळ इच्छा शक्ती नव्हती. त्यांनी केवळ मुठभर उद्योगपतींच्या हिताचाच विचार केला. या देशातील जनतेने यांना तळे रुपी देश राखायला दिला होता. पाच वर्षांत यांनी अख्खा देशच खाऊन टाकला आहे. आता यांनाच जनता या निवडणुकीत शिल्लक ठेवणार नाही. सत्तांतराशिवाय देशाची प्रगती होणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.