मंचर- अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे राज्य अधिवेशन श्रीक्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे जानेवारी 2020 मध्ये होणार आहे. दोन दिवसीय कार्यक्रमात ग्रंथदिंडी, कथाकथन, बालकांचे कलाविष्कार, युवक व महिलांसाठी परिसंवाद, उत्कृष्ट कथामाला व कार्यकर्ता पुरस्कार वितरणाबरोबर राष्ट्रभूषण विशेषांक प्रकाशन करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यवाह शामराव कराळे गुरुजी यांनी दिली.
यावेळी कथामाला कार्यकर्त्यांची सहविचार सभा कळंब (ता. आंबेगाव) येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कानडे होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी व साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन राज्य प्रतिनिधी रमेश तांबे व मनीषा कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय डुंबरे, बाळासाहेब घोडे, संजय शिर्के, साहेबराव शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात जुन्नर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष उपेंद्र डुंबरे, केंद्रप्रमुख विजय सुरुकुले, विद्या प्राधिकरणच्या वैशाली गाढवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक शैलेंद्र चिखले, रवींद्र वाजगे, कथामालेचे तालुकाध्यक्ष सीताराम गुंजाळ, संतोष गवारी, सरदार समाधान, संतोष थोरात, चांगदेव पडवळ, बबनराव सानप, संतोष गडगे आदी उपस्थित होते.