मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर बरेच कमी पातळीवर ठेवल्यामुळे गृहकर्जांसह इतर कर्जावरील व्याजदर अगोदरच कमी आहेत. आता भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने घरासाठीच्या कर्जावर मोठी सूट जाहीर केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इतर बॅंकाही अशीच सूट जाहीर करण्याची शक्यता आहे.
स्टेट बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार गृहकर्जावर 0.30 टक्के म्हणजे 30 बेसीस पॉईंटइ्ची सूट मिळणार असून प्रक्रिया शुल्क पूर्णपणे म्हणजे 100 टक्के माफ करण्यात येणार आहे. ग्राहकांच्या सिबिल स्कोअरशी ही नवी सूट संलग्न करण्यात आलेली आहे. या योजनेनुसार 30 लाख रुपयापर्यंतच्या घरासाठीच्या कर्जावर 6.80 टक्के व्याज दरापासून सुरुवात होणार आहे. 30 लाख रुपयांवरील घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर 6.95 टक्के पासून सुरू होणार आहेत.
कर्ज घेणाऱ्या महिलांना 0.05 टक्के म्हणजे 5 बेसिस पॉईंटस् सूट मिळणार आहे. गेल्या काही महिन्यात बॅंकांनी कर्जाचे व्याजदर कमी केल्यामुळे देशात थंडावलेली घर विक्री वाढत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याने मर्यादित काळासाठी मुद्रांक शुल्क आणि प्रीमियममध्ये घट केली आहे. त्यामुळे घरांची विक्री वाढत असल्याची आकडेवारी जाहीर होत आहे.
आता स्टेट बॅंकेने घरासाठीच्या कर्जावर आणखी सवलत दिल्यामुळे घरखरेदीसाठी चालना मिळण्याची शक्यता आहे. स्टेट बॅंकेने स्पष्ट केले आहे की पुण्यासारख्या आठ मेट्रो शहरात 5 कोटी रुपयापर्यंतच्या घरासाठीच्या कर्जावर 0.3 टक्क्यांची सूट उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे स्टेट बॅंकेच्या योनो या ऍपवरून घरबसल्या जर घरासाठीच्या कर्जासाठी अर्ज केला तर अतिरिक्त 0.05 टक्क्यांची सूट मिळणार आहे.
ही अतिरिक्त सूट देण्याची योजना ग्राहकांना मार्च 2021 पर्यंत उपलब्ध होणार आहे. या कालावधीत ग्राहकांनी कर्ज घ्यावे अशी बॅंकेची इच्छा आहे. मुद्रांक शुल्क आणि प्रीमियममध्ये घट तसेच स्टेट बॅंकेने जाहीर केलेल्या योजनेमुळे कुंपणावर बसून असलेले ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतील असे समजले जाते.