स्टार्टअपना मिळणार पाच लाखांचा पुरस्कार

अर्ज 31 डिसेंबरपर्यंत सादर करता येणार : 35 क्षेत्रांचा विचार

पुणे – नव्या तंत्रज्ञानावर आधारित विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करणाऱ्या स्टार्टअपना चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचाच भाग म्हणून स्टार्टअपसाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

स्टार्टअप मुळे देशांमध्ये उद्योग-व्यवसायाची संस्कृती वाढते. समृद्धी निर्माण करणारी केंद्रे निर्माण होतात आणि रोजगारात वाढ होते. त्यासाठी नवे उद्योग वाढावे अशी यामागील धारणा आहे. अंतर्गत व्यापार आणि उद्योग प्रोत्साहान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार या पुरस्कारासाठीचे अर्ज 31 डिसेंबरपर्यंत सादर करता येणार आहेत.

देशाच्या विविध क्षेत्रांतील प्रश्‍न सोडवण्याची क्षमता असलेल्या स्टार्टअपचा यासाठी विचार करण्यात येईल. यासाठी 35 क्षेत्रांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये शेती, शिक्षण, उद्योगासंदर्भातील तंत्रज्ञान, ऊर्जा, वित्त, आरोग्य, आधुनिक उद्योग, अवकाश, सुरक्षा, पर्यटन आणि नागरी सुविधांचा समावेश आहे. 35 क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक स्टार्टअपला पाच लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल.

त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावरील चार स्टार्टअपना त्यांचे काम गुंतवणूकदारांपुढे मांडण्याची सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. स्टार्टअपना मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ही पुरस्कार दिले जाणार आहेत. ग्रामीण भागात अनेक प्रश्‍न आहेत. ते प्रश्‍न सोडविण्याची क्षमता असलेले नवे तंत्रज्ञान विकसित होण्याची गरज असल्याचे या स्टार्टअपना सरकारने वेळोवेळी सांगितले आहे. त्यानुसार अनेक स्टार्ट अपनी काम सुरू केले आहे.

पुण्यातील स्टार्टअपच्या संख्येत वाढ
शिक्षण, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान कंपन्या असल्यामुळे बंगळुरू आणि पुणे शहरामध्ये सुरुवातीपासून स्टार्टअपची संख्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे. त्याचबरोबर पुण्यातील अनेक संस्थांनी पुण्यामध्ये स्टार्टअपची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पुण्यातील स्टार्टअप ची संख्या वाढू लागली असल्याचे दिसून येते. सरकारने जाहीर केलेल्या पुरस्कारामुळे स्टार्टअप संस्कृतीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.