नवी दिल्ली – इलेक्ट्रिक वाहन निर्माण करणाऱ्या अमेरिकन टेस्ला कंपनीने अगोदर भारतात उत्पादन सुरू करावे. त्यानंतर या कंपनीला कर सवलती देण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येईल असे अवजड उद्योग मंत्रालयाने या कंपनीला सांगितले आहे.
सध्या भारतामध्ये अनेक वाहन कंपन्या उत्पादन घेत आहेत. या कंपन्यांना कसल्याही सवलती दिल्या जात नाहीत. फक्त टेस्ला कंपनीला सवलती दिल्या तर या क्षेत्रात चुकीचा संदेश जाईल असे मंत्रालयाने म्हटले आहे.
सध्या भारतात 40 हजार डॉलरवरील इलेक्ट्रिक वाहनावर जवळ-जवळ 110 टक्के कर आकारला जातो. प्रदूषण कमी करणाऱ्या कारवर इतक्या मोठ्या प्रमाणात कर आकारला जाणे अयोग्य आहे असे टेस्ला कंपनीचे म्हणणे आहे. या कारवर 40 टक्केपेक्षा जास्त कर असू नये असेही कंपनीने सांगितले आहे. जर कर कमी केला तर भारतामध्ये अशा वाहनांचे उत्पादन आणि विक्री वाढेल आणि इलेक्ट्रिक वाहनासाठी एक पूरक वातावरण निर्मिती होईल.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी टेस्ला कंपनीला भारतात उत्पादन सुरू करण्याची सुवर्णसंधी आहे, असे सांगितले आहे. ही कंपनी भारतातून अनेक सुटे भाग घेते. त्यामुळे कंपनीने भारतातच उत्पादन सुरू केल्यानंतर कंपनीला अधिक फायदेशीर ठरेल असे गडकरी यांनी म्हटले आहे.