तळेगाव दाभाडे – काकासाहेब खळदे मार्गालगत मंत्रा सिटीसमोर कष्टकरी राजा फार्मर्स मार्केट तर्फे आयोजित शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यात आला आहे. या बाजाराचे उद्घाटन गुरुवार (दि. 21) आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कृषी तज्ञ नवनाथ गरुड, विनोद टकले, नितीन फाकटकर, महेश बेंजामिन, विनय सरोदे,संदीप खळदे,अमर खळदे, संगीता खळदे सायली खळदे, स्नेहा खळदे, भूषण खळदे, सुभाष खळदे, निलेश खळदे अभय देवकर,पांडुरंग करंडे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, गोकुळ किरवे,विलास पिचड सह शेतकरी, काकासाहेब खळदे नगर मधील सर्व सदस्य व नागरिक उपस्थित होते.
तळेगावची वाढती लोकसंख्या व तिला आवश्यक असणाऱ्या भाजीपाल्याची सुविधा सर्वांना मिळावी म्हणून युवा कार्यकर्ते संकेत खळदे यांच्या संकल्पनेतून या आठवडे बाजाराची सुरुवात करण्यात आली आहे. कष्टकरी राजा ऍग्रो फार्मर प्रॉडक्शन कंपनी लिमिटेडकडून महाराष्ट्र राज्य कृषी पणन् मंडळ व कृषी विभाग पुरस्कृत शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून ही सुविधा दर गुरुवारी सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.
या आठवडे बाजारामध्ये आलेला माल हा सेंद्रिय खताचा वापर करून तयार केलेला असेल असे कृषी तज्ज्ञ नवनाथ गरुड यांनी सांगितले. तसेच या कष्टकरी राजा फार्मर्स मार्केटचे एकूण 570 सभासद असून या ठिकाणी 50 टेन्टची उभारणी शेतकरी स्वतः प्रत्येक गुरुवारी करणार असून यामध्ये विविध व्हरायटीचा भाजीपाला व इतर माल ठेवण्यात येणार आहे. आमदार सुनील शेळके यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले असून तळेगावकरांना स्वच्छ भाजीपाला मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले.