स्थायी समितीच्या सल्लागारांना ‘पायघड्या’

पालिकेत अधिकारी कमी, सल्लागार जास्त

पिंपरी – अधिकारी कमी आणि सल्लागार जास्त अशी महापालिकेच्या कारभाराची अवस्था झाली आहे. स्थायी समितीच्या आज (गुरुवारी) झालेल्या सभेत तब्बल 57 कामांसाठी सल्लागार नेमणुकीचा घाट घालण्यात आला. सभापटलावरील नऊ कामांसाठी सल्लागार नेमणुकीखेरीज आयत्यावेळच्या प्रस्तावाद्वारे 48 सल्लागारांना पायघड्या घालण्यात आल्या.

सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. महापालिकेचा कारभार सल्लागार हाकत असल्याची टीका सर्वस्तरातून होत असताना त्याकडे कानाडोळा करीत सल्लागारांना पायघड्या घालण्याची परंपरा स्थायी समितीने कायम ठेवली आहे.

प्रशासनाकडून विषय पत्रिकेवर नऊ सल्लागार नेमणुकीचे प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्याला मंजुरी देतानाच आयत्यावेळी प्रशासन आणि सदस्य अशा दोघांनी मांडलेल्या तब्बल 48 कामांसाठी सल्लागार नेमणुकीला मंजुरी देण्यात आली. यामध्ये महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याबरोबरच ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 22 तर ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 23 कामे तसेच वाकड ते दत्त मंदिर रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यासाठी सल्लागार नेमणुकीला मंजुरी
देण्यात आली.

मोशीतील मोरया कॉलनी फातिमा नगर, खानदेशनगर, संत ज्ञानेश्‍वरनगर या ठिकाणचे रस्ते विकसित करण्यासाठी तसेच ह क्षेत्रीय स्थापत्य विभागांतर्गत मुळा नदी पात्रालगत 12 मीटर रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी, माकन चौक ते शुद्धीकरण केंद्र ते वसंतदादा पाटील पुतळा व परिसरातील रस्ते विकसित करणे, सांगवी परिसरातील मुख्य रस्ते विकसित करण्यासाठी मेसर्स इन्फिनिटी कन्सल्टींग इंजिनिअर्स यांची व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पुणे-मुंबई द्रूतगती मार्ग विकास आराखड्यानुसार विकसित करण्यात येणार आहे. या कामांतर्गत वाकड ते मुकाई चौक तसेच सेवा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी इन्फ्राकिंग कन्सल्टिंग इंजिनिअर्स प्रा. लि. यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 11 मधील घरकुल चौकामध्ये स्पाईन रस्त्यावर रस्ता ग्रेडसेपरेटर तयार करणे व स्वामी विवेकानंद हॉल ते थरमॅक्‍स चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणासाठी सी. व्ही. कांड, म्हेत्रेवस्तीतील शाळा इमारत विस्तारीकरण व प्राधिकरणाकडून हस्तांतरीत झालेल्या मोकळ्या जागेवर व्यायामशाळा बांधण्यासाठी मनस्वी आर्किटेक्‍ट, फ प्रभागात ठिक ठिकाणी सुशोभिकरणाची कामे करण्यासाठी शिल्पी आर्किटेक्‍ट ऍण्ड प्लॅनर्स यांना सल्लागार म्हणून नेमण्यास स्थायी समितीने विनाचर्चा मंजुरी दिली. “तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या पद्धतीने सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही सल्लागार नेमणुकीच्या प्रस्तावाचा डाव
साधून घेतला.

आरोपानंतरही वाढीव खर्च मंजूर
महापालिकेच्या एकाच ठेकेदाराला अनेक कामे दिली जातात. ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांमुळे पाणी वितरण व्यवस्थेत त्रुटी निर्माण झाल्या आहेत. अशी ओरड काल झालेल्या महासभेत विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी केली होती. या ठेकेदाराला पाण्याच्या टाकींवरील वितरण व्यवस्थेसाठी ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरविण्यासाठी सव्वा कोटींचा वाढीव खर्च देण्यास स्थायी समितीने विरोध दर्शविला. मात्र, याप्रकरणी चौकशी करुन 15 दिवसांत अहवाल सादर केला जाईल, असे आश्‍वासन सभेत प्रशासनाने दिल्यानंतर स्थायी समितीने मजूर पुरविण्याच्या कामाला मुदतवाढ देण्याबरोबरच वाढीव खर्चाला हिरवा कंदील दर्शविला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.