मुद्रांक घोटाळा प्रकरण : बनावट शिक्‍का बनविणारा अटकेत

पुणे – मुद्रांक घोटाळा प्रकरणात बनावट शिक्‍का बनवून देणाऱ्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याला आणि यापूर्वी अटक केलेल्या तिघांना 23 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. जोंधळे यांनी दिला.

रवींद्र मच्छिंद्र ससाणे (वय 49, रा. दत्तमंदिराजवळ, शिवाजीनगर) याला आणि यापूर्वी अटक केलेले चिन्मय सुहास देशपांडे (वय 26), सुहास मोरेश्‍वर देशपांडे (वय 59), सुचेता सुहास देशपांडे (वय 54, तिघेही रा. पारसनीस वाडा, कसबा पेठ) यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शासकीय कोषागारातील अधिकाऱ्यांची बनावट सही तसेच शिक्‍क्‍यांचा वापर करून मुद्रांकाची विक्री केल्याप्रकरणी शनिवारवाड्याजवळील देशपांडे स्टॅम्प व्हेंडर्सवर मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत शंभर आणि पाचशे रुपयांचे 86 लाख 38 हजारांचे 11 हजार 736 मुद्रांक जप्त केले आहेत. पोलीस कोठडीत आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी ससाणे याचे नाव सांगितले. त्यानुसार त्याला अटक केली आहे. दरम्यान, त्याला आणि यापूर्वी अटक केलेल्या तिघांना पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.