मांडवगण पोलीस स्टेशनची कारवाई : 12 हजार रुपयांचा मुद्देमाल
मांडवगण फराटा- नागरगाव (ता. शिरूर) येथील अवैध दारूधंद्यावर शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या आदेशान्वये व साहायक पोलीस निरीक्षक बिरदेव काबुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा पोलीस दूरक्षेत्र टीमने कारवाई करून 12 हजार रुपये किमतीची 600 लिटर हातभट्टी दारू नष्ट केली आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. 25 रोजी करण्यात आली.
नागरगाव येथील कोद्रे वस्ती भीमा नदीकाठी पप्पू कोळेकर, भाऊसाहेब पवार हे गावठी दारू काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी मांडवगण फराटा पोलीस पोलीस हवालदार अे. जे. जगदाळे, के. एल. ढुके, ए. एन. तारू, होमगार्ड एस. जी. जगताप, ए. एस. शेख, एम. एल. शेख यांच्या पथकाने या ठिकाणी छापा घातला. गावठी दारू बनविण्याच्या तयारीत असणारे दोघेजण पोलीस आल्याची माहिती मिळताच असता हातभट्टी दारू तयार करण्याची साधने जवळ बाळगून दारू तयार करण्याच्या तयारीत होते. परंतु त्यांना पोलीस येत आहेत, याची चाहूल लागताच हे साहित्य त्याठिकाणी टाकत ते पळाले. चार प्लॅस्टिक बॅरल, हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व इतर साहित्य याप्रमाणे 12 हजारांचा माल मिळून आला. कच्चे रसायन पंचासमक्ष त्याचठिकाणी नष्ट करण्यात आले.