पुणे – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे आयोजित सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत साखळी फेरीत लॉयला स्कुल, सेंट व्हिन्सेंट स्कुल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत हॉकी लीगमध्ये स्कायलर राज (१,५,१०,१४,२५ मि.,) याने केलेल्या पाच गोलच्या जोरावर लॉयला स्कुल संघाने मॉडर्न हायस्कूलचा १०-० असा धुव्वा उडवला. दुसऱ्या सामन्यात लॉयला स्कुल संघाने सेंट पॅट्रिक्स ‘ब’ संघाचा ५-१ असा पराभव केला.
अयान शेख (२,५,१५ मि.) याने केलेल्या तीन गोलच्या जोरावर आझम कॅम्पस संघाने मॉडर्न हायस्कूल संघाचा ३-२ असा संघर्षपूर्ण पराभव केला. सेंट पॅट्रिक्स ‘ब’ संघाने सेंट व्हिन्सेंट ‘ब’ संघाचा ७-० असा पराभव केला. सेंट पॅट्रिक्स ‘ब’ संघाकडून ऑस्टिन फ्रान्सिस (३,७,१५ मि.), प्रणित बारुटकर (२,८,१४ मि.) यांनी प्रत्येकी तीन गोल केले.
फुटबॉल लीगमध्ये पहिल्या सामन्यात सेंट व्हिन्सेंट हायस्कुल संघाने दस्तूर बॉईज संघावर ९-० असा एकतर्फी विजय मिळवला. विजयी संघाकडून अनिश लोढाने (३,४,६,८ मि.) चार गोल, जोएल चेरियनने (२,७,१६ मि.) तीन गोल, अझलन लाडगे (१० मि.) व आयुष रान (२२ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाला विजय मिळवून दिला. अन्य लढतीत पार्थ पाटील (१२ मि.) याने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर हचिंग्स संघाने आर्यन वर्ल्ड स्कूलचा १-० असा पराभव केला. ह्यूम मॅकहेन्री संघाने दस्तूर को-एड स्कूलचा ४-० असा पराभव केला.
स्पर्धेचे उदघाटन प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेंट व्हिन्सेंट हायस्कुलचे व्यवस्थापक फादर फ्रान्सिस डिसुझा, गुरुजी तालीम मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, अंजनेय साठे आदी उपस्थित होते. डॉ. विल्सन अँड्र्यू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य फादर फ्रेंन्सिस पाटेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.