Mahesh Gaikwad – उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील पदाधिकारी असल्यामुळे याची जोरदार चर्चा सुरु आहे.विरोधकांनी देखील यावरून सरकारला घेरण्यासाठी कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. अशात खासदार श्रीकांत शिंदे यांनी दोन्हही जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती दिली.
उल्हासनगर येथे झालेल्या या फायरिंगमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबतची माहिती दिली. श्रीकांत शिंदे म्हणाले,”काल रात्री महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर जो हल्ला झाला त्यानंतर त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. महेश गायकवाड यांच्यावर सहा तास शस्त्रक्रिया पार पडली त्यानंतर डॉक्टरांनी सहा बुलेट्स बाहेर काढल्या आहेत. आता त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून पूर्ण ऑब्सर्वेशन खाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. ”
शिंदे पुढे म्हणाले,”राहुल पाटील याच्यावर देखील सर्जरी झाली असून त्यांच्या देखील गोळ्या काढण्यात आल्या आहेत .त्यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी येऊन डॉक्टरांशी देखील चर्चा केली असल्याची माहिती यावेळी श्रीकांत शिंदे यांनी दिली.
सीसीटीव्ही फुटेज सर्वांसमोर आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत. लवकरात लवकर यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई अपेक्षित असल्याचे देखील श्रीकांत शिंदे यांनी म्हंटले.