जुन्या गाजलेल्या गाण्यांना नव्या सिनेमामध्ये नव्या ढंगात सादर करण्याचा ट्रेन्ड आता नवीन राहिलेला नाही. अगदी “तेजाब’मधील माधुरी दीक्षितच्या “एक, दो, तीन…’चेही रिक्रिएशन बॉलीवूडमध्ये झाले आहे. आता श्रीदेवीच्या “चालबाज’मधील प्रसिद्ध गाणे “तेरा बीमार मेरा दिल’ हे आगामी “पागलपंती’मध्ये नव्या ढंगात पुन्हा एकदा सादर केले जाणार आहे. जॉन अब्राहम अणि उर्वशी रौतेला यांच्यावर या नव्या गाण्याचे शुटिंग होणार आहे.
मूळ गाणे 1989 सालच्या “चालबाज’मध्ये श्रीदेवी आणि सनी देओलवर चित्रीत झाले होते. श्रीदेवीबद्दल आपल्याला आदर असल्याने हे गाणे तिला आदरांजली वाहण्यासाठीच नव्याने सादर केले जाणार आहे, असे उर्वशी रौतेलाने सांगितले. महान अभिनेत्री श्रीदेवीच्या गण्याला नव्याने सादर करताना आपल्याकडून कोणतीही चूक व्हायला नको, ही भीती सारखी वाटत होती.
म्हणूनच या गाण्याचे शुटिंग करताना आपल्यावर दडपण आले होते, असेही तिने सांगितले. श्रीदेवीच्या फॅन्सना हे रिक्रिएशन नक्कीच आवडेल, अशी तिला खात्री आहे. “पागलपंती’मध्ये अनिल कपूर, जॉन अब्राहम, एलियाना डिक्रूझ, , अर्शद वारसी, पुलकित सम्राट, उर्वशी रौतेला आणि कृती खरबंदा असणार आहेत. हा सिनेमा 22 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.