प्रायमुव्हकडून अहवाल देण्यास नकार
पुणे – शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मागील महिन्यात आंबिल ओढ्याला आलेल्या पुराच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाकडून आंबिल ओढ्याच्या तातडीच्या सर्वेक्षणाचे काम “प्रायमुव्ह’ या संस्थेस देण्यात आले होते. हे सर्वेक्षण या संस्थेने पूर्ण केले असले तरी, या कामाची कोणतीही लेखी वर्क ऑर्डर, कामासाठी किती बील देणार याचे कोणतेही लेखी स्वरुपातील पत्रे महापालिकेने या संस्थेस अद्यापही दिलेली नसल्याने या संस्थेने हा सर्वेक्षणाचा अहवाल देण्यास पालिकेस नकार दिला आहे. या अहवालात ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणांसह इतर काही बाबींच्या सर्वेक्षणाचा समावेश असल्याची माहिती महापालिकेतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
मागील महिन्यात 25 आणि 26 सप्टेंबर रोजी दक्षिण पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाने आंबिल ओढ्याला पूर आला होता. या पुरामुळे ओढ्याच्या काठावर असलेल्या घरांमधील हजारो नागरिकांना फटका बसला होता. तर सुमारे 10 ते 15 जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाकडून आंबिल ओढ्याच्या फेरसर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला. या ओढ्याचे सर्वेक्षण 2005 मध्ये “प्रायमुव्ह’ या संस्थेकडून करण्यात आले होते. त्यामुळे पालिकेने पूरस्थिती आणि तातडीची बाब लक्षात घेऊन याच संस्थेस हे प्राथमिक सर्वेक्षण करणाच्या सूचना दिल्या होत्या. त्यात प्रामुख्याने 2005 नंतर नाल्यामध्ये झालेली अतिक्रमणे आणि नाला वळविण्याच्या प्रकारासह नाल्याच्या सद्य:स्थितीचा समावेश होतो. महापालिकेच्या विनंतीनुसार, प्रायमुव्हकडून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र, त्याचा अंतीम अहवाल अद्याप या संस्थेकडून महापालिकेस देण्यात आलेला नाही.
कामासाठी निधी कोण देणार?
याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, महापालिकेकडून या संस्थेस काम करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला ठराव, त्यांना किती निधी द्यायचा याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
परिणामी संस्थेने या प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय, अहवाल देणार नसल्याचे सांगितले असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले. तसेच, या कामासाठी निधी कोण देणार, कोणत्या खात्याचा निधी द्यायचा हे सुद्धा निश्चित नाही, त्यामुळे अहवाल मिळालेला नसल्याचे ते म्हणाले.