पिंपरी (अँकर स्टोरी) – राज्य सरकारने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना 1 हजार 500 रुपयांची मानधनवाढ घोषित केल्यानंतर अंगणवाडी सेविकांचा सुरू असलेला बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अंगणवाडी सुरू करण्यात आल्या असून अंगणवाडी सेविका देखील कामावर रुजू झाल्या आहेत. मात्र केवळ घोषणा न करता निधीची तरतूद करून प्रत्यक्ष घोषणा अंमलात आणण्याची मागणी सेविकांची आहे. तसेच सध्या तात्पुरते आंदोलन स्थगित केले असून राज्य शासनासोबत बैठका घेऊन पुढील निर्णय घेऊ, अशी भूमिका अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने घेण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या दारात हेलपाटे मारत आहेत. संघटनांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आंदोलन छेडली जात आहेत. मात्र राज्य सरकार या मागण्यांबाबत उदासीन असल्याचे निदर्शनास आल्याने अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. सरकार विरोधात आंदोलने करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातील दीड हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस देखील या संपात सहभागी झाले होते. शासनाने या आंदोलनाची दखल घेत 1 हजार 500 रुपये मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
ही घोषणा केल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी आपला संप मागे घेतला आहे. अधिवेशन संपल्यानंतर पुढे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात येत आहे.
सरकारने 1 हजार 500 रुपये मानधनवाढ दिलेली असून त्यामुळे पुर्ण समाधान नाही. मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी अंगणवाडी सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. सरकारच्या प्रतिनिधींसोबत बैठका झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ. महिन्याला 16 हजार रुपये वेतन मिळावे ही आमची मुख्य मागणी आहे.
– नितीन पवार, अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा.
सध्या अंगणवाडी सेविकांना साडे सात हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जात आहे. तर साडे चार हजार रुपयांचे मानधन मदतनीसला दिले जाते. ही तुटपुंजी रक्कम असून महिन्याला किमान वेतन 16 हजार रुपये देण्याची मागणी सातत्याने संघटनांकडून होत आहे. त्यामुळे सध्या मिळणारी मानधनवाढ फार समाधान देणारी नसून पुढील लढा वेतनवाढ मिळण्यासाठी करणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले.