कोलोंबो – श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव आज संसदेत फेटाळण्यात आला. देशासमोर उभ्या असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्याविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याच अनुषंगाने तमिळ नॅशनल अलायन्स या पक्षाचे खासदार एम.ए. सामंथिरन यांनी अध्यक्षांच्याविरोधात अविस्वास ठराव मांडला होता. संसदेचे स्थायी आदेश स्थगित करून अध्यक्षांवरील अविश्वास ठरावावर चर्चा करण्याच्या प्रस्तावाविरोधात संसदेतील 119 खासदारांनी मतदान केल्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. या प्रस्तावाच्या बाजूने केवळ 68 खासदारांनी मतदान केले. त्यामुळे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे संसदेत पराभव होण्यापासून बचावले.
विश्वास ठराव आणून अध्यक्षांच्याविरोधातील असंतोषाला किती प्रतिसाद मिळतो हे विरोधकांना तपासून पहायचे होते. संसदेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समागी जन बलवेगया पक्षाचे खासदार लक्ष्मण किरीयेला यांनी या अविश्वास ठरावाला अनुमोदन दिले होते. नवनियुक्त पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्यासह अन्य काही खासदारांनी या अविस्वास प्रस्तावाविरोधात मतदान केले, असे “एसजेबी’चे खासदार हर्ष डीसेल्वा यांनी सांगितले.
मात्र या मतदानामुळे अध्यक्ष राजपक्षे यांची पाठराखण करणारे खासदार उघडे पडले, असे मानवी हक्क विषयक कार्यकर्ते विधीज्ञ भवानी फोन्सेका यांनी म्हटले आहे.
रनिल विक्रमसिंघे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर संसदेचे कामकाज आज प्रथमच सुरू झाले. देशातील आर्थिक परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी संसदेमध्ये काही महत्वाच्या उपाय योजनांवर चर्चा घडवणे सरकारला आवश्यक असतानाच हा अविस्वास ठराव मांडला गेला होता.