कोलंबो :- दहशतवादी कृत्ये ही लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहेत. या कृत्यांचा मी निषेध करतो. सरकार लोकशाहीवादी सार्वजनिक आंदोलकांच्या मागण्या ऐकण्यास तयार आहे. असे श्रीलंकेचे नवनियुक्त पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी म्हटले आहे.
माजी राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांचे सहकारी आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे शालेय मित्र असलेले 73 वर्षीय गुणवर्धने यांनी गेल्या आठवड्यात देशातील अभूतपूर्व आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.
बुधवारी ते म्हणाले, सरकार जनतेचा विरोध ऐकण्यास तयार आहे, परंतु दहशतवादी कारवाया अस्वीकार्य आहेत. वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असू शकतात परंतु लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी संसदेने एकत्र काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी दहशतवाद हा लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे सांगितले.
दरम्यान, श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे, माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे आणि सेंट्रल बँकेचे माजी गव्हर्नर अजित निवार्ड काब्राल यांना 2 ऑगस्टपर्यंत देश सोडण्यास मनाई केली आहे. त्याच्यावर याआधी 28 जुलैपर्यंत परदेशी प्रवास बंदी घालण्यात आली होती.
सिंगापूर सरकारने नवीन व्हिसा जारी करून श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्या देशात राहण्याची मुदत 14 दिवसांनी वाढवली आहे. मीडियामध्ये आलेल्या एका बातमीनुसार, राजपक्षे यांच्या ट्रॅव्हल पासची मुदत 11 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. देशाची अर्थव्यवस्था न हाताळल्याबद्दल जनक्षोभ लक्षात घेऊन ते 13 जुलै रोजी मालदीवला रवाना झाले आणि तेथून दुसऱ्या दिवशी खाजगी भेटीवर सिंगापूरला पोहोचले होते.