श्रीलंकेतील आणिबाणीची मुदत वाढवली

कोलंबो – श्रीलंकेचे अध्यक्ष मैथरीपाला सिरीसेना यांनी आज देशातील आणिबाणीची मुदत आणखी वाढवली आहे. ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटाच्या घटनेनंतर देशात आणिबाणी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे नागरीकांच्या हक्कांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले होते. तथापी काही काळानंतर ही आणिबाणी उठवण्यात येईल अशी ग्वाही सरकारने दिली होती पण अचानकच त्याची मुदत वाढवण्यात आल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे. आधीच्या आणिबाणीची मुदत आजच संपत होती.

आणिबाणी लागू करण्यात आल्याने सरकारला कोणत्याही संशयास्पद व्यक्तीला विनाचौकशी अटक करण्याचे अधिकार मिळाले आहेत. स्फोटांच्या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण शंभरावर लोकांना अटक केली असून त्यात दहा महिलांचा समावेश आहे.

सिरीसेना यांनी विदेशी दूतांशी बोलताना मे महिन्यात सांगितले होते की देशातील स्थिती आता 99 टक्के पुर्वपदावर आली असून आपण जून महिन्यात आणिबाणीची मुदत संपल्यानंतर लगेच ती मागे घेणार आहोत. पण त्यांनी प्रत्यक्षात मात्र त्याची मुदत वाढवली आहे. याचे नेमके कारणही अजून सरकारने दिलेले नाही. या स्फोटांच्या संबंधात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल काही उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांचीही सध्या चौकशी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.