#AO2021 : जोकोवीचचे आठरावे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद

अंतिम सामन्यात मेदवेदेववर तीन सेटमध्ये सहज मात

मेलबर्न – सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच याने नववे ऑस्ट्रेलियन टेनिसचे विजेतेपद पटकावताना कारकिर्दीतील 18 वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदही साजरे केले.

रविवारी ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोवीचने रशियाच्या डॅनियल मेदवेदेववर 7-5, 6-2, 6-2 असा सलघ तीन सेटमध्ये विजय मिळवला व अपेक्षेप्रमाणे विजेतेपदही पटकावले.

पहिल्या सेटमध्ये मेदवेदेवने जोकोवीचचा चांगलीच लढत दिली. हा सेट टायब्रेकरमध्ये गेला तेव्हा चाहत्यांची उत्कंठाही शिगेला पोहोचली होती. ज्या पद्धतीने या स्पर्धेत मेदवेदेवने पहिल्या फेरीच्या सामन्यापासून विजयाचा धडाका लावला होता ते पाहता तो या सामन्यातही जोकोवीचचा सहजा सहजी विजेतेपद मिळवू देणार नाही हे स्पष्ट दिसत होते.

मात्र, पहिला सेट जोकोवीचने जिंकल्यानंतर अचानक मेदवेदेवच्या खेळात काहीसा संथपणा आला. त्याला सर्व्हिसही वेगवान करता येत नव्हती. त्याने पहिला सेट गमावल्यावर विनाकारण दडपण घेतले व त्यातच त्याने दुसरा सेट 6-2 असा गमावला. या सेटमध्ये जोकोवीचच्या नेटजवळील फटक्‍यांना मेदवेदेवकडे उत्तरच नव्हते. तिसरा सेट सुरू झाल्यावर पहिले तीन गेम जोकोवीचने सहजच जिंकले. मात्र चौथ्या गेममध्ये मेदवेदेवने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. अर्थात, अनुभवी जोकोवीचच्या वेगवान सर्व्हिसवर मेदवेदेव पूर्णपणे गांगरला होता.

त्याला रिटर्नही करता येत नव्हते. त्याला तिसऱ्या सेटमध्येही जोकोवीचने नेटजवळच खेळवले आणी या सेटसह हा सामना व विजेतेपदही पटकावले. 33 वर्षांच्या जोकोवीचचे हे 9 वे ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद ठरले. त्याने कारकिर्दीतील 18 वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदही साजरे केले. या सामन्यासह जोकोवीचने गेल्या 10 पैकी 6 स्पर्धांचे विजेतेपदही साकार केले.

या विजेतेपदसाच्या जोरावर तो जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम राहिला असून सलग 311 आठवडे पहिल्या क्रमांकावर राहण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे. त्याने रॉजर फेडररला मागे टाकत ही कामगिरी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.