पुणे – कर्नल भगत हायस्कूल, पीसीएमसी स्कूल, लॉयला आणि सेंट पॅट्रिक स्कूल यांनी फादर शॉच मेमोरियल तिसऱ्या आंतरशालेय हॉकी स्पर्धेतील चौदा वर्षांखालील विभागात उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. ही स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे आयोजित करण्यात आली आहे.
एक्स लॉयला स्टुडंट्स नेटवर्क (ईएल एएन) आणि लॉयला प्रशाला, पुणे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत शहरातील डझनभर संघांना आकर्षित केले आहे आणि त्या अनुक्रमे १२,१४ व १७ वर्षाखालील गटात आयोजित करण्यात आल्या आहेत. कर्नल भगत हायस्कूलने अंतिम चार संघांमध्ये प्रवेश करण्यासाठी लोकमान्य टिळक शाळेचा ३-० असा सहज पराभव केला. ईशान परदेशी याने दोन गोल करीत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. अयान शेख यांनी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली. याआधीच्या सामन्यामध्ये कर्नल भगत हायस्कूलने मॉडर्न प्रशाला, शिवाजीनगर विरुद्ध शूट-आऊटद्वारे ४-३ असा रोमांचकारी विजय मिळवला.
पूर्ण वेळेअखेर दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते. कार्तिक पिल्ले (७व्या) याने कर्नल भगत हायस्कूलला आघाडी मिळवून दिली. श्रेयस मुसळे (३९ वे आणि ५८ वे) याने मॉडर्नसाठी गोल करीत संघास आघाडी मिळवून दिली. १-२ ने पिछाडीवर, कर्नल भगत हायस्कूलने चैतन्य आठवले (५९ व्या) याने पेनल्टी कॉर्नरद्वारा केलेल्या गोलाच्या जोरावर २-२ अशी बरोबरी साधली आणि गेम शूट-आउटमध्ये नेला.
त्यानंतर शूटआऊटमध्ये कर्नल भगत हायस्कूलसाठी कार्तिक आणि अर्श शेख यांनी गोल केले, तर स्वयंभू पारधे याने मॉडर्नसाठी एकमेव गोल केला. श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल, नारायणगाव संघाने लॉयला हायस्कूल, पाषाण संघाला पुढे चाल दिली. शेवटच्या सामन्यात, पीसीएमसी स्कूलने प्रिन्स पटियाल (१०वा, १८वा, ४९वा) याच्या तीन गोलच्या जोरावर मुक्ताई मराठी शाळेचा ५-० असा दणदणीत पराभव केला.
रोहन मस्के (४९वे) आणि अली शेख (५६ वे) यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली. उपांत्य फेरी पूर्ण करताना सेंट पॅट्रिक्सने संत तुकाराम प्रशालेवर ७-० असा विजय मिळवला. विजयी संघाकडून शौर्य मेंगे (२०वे, ३२वे, ४३वे, ५०वे) याने गोलांचा चौकार मारला. किरण खडका ( पाचवा), जेम्स निट्टा (१४वा) आणि संदेश कुदळे (३०वा) यांनी प्रत्येकी एक गोल केला.