पतियाळा – पतियाळा आणि बेंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्रात जवळपास 30 खेळाडू आणि सहायक कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली असली तरी त्यात एकही ऑलिम्पिक पात्र खेळाडूचा समावेश नाही, त्यामुळे ऑलिम्पिकच्या सरावावर कोणताही परिणाम होणार नाही, असा खुलासा साईकडून करण्यात आला आहे.
या दोन्ही केंद्रांतील नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सराव करत असलेल्या खेळाडूंची तसेच सपोर्ट स्टाफमधील सदस्य मिळून एकूण 741 जणांची करोना चाचणी करण्यात आली होती. यातून ज्या खेळाडूंना करोनाची बाधा झाली त्यात टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या एकाही खेळाडूचा समावेश नाही. भारताच्या पुरुष मुष्टियुद्ध संघाचे मुख्य प्रशिक्षक सीए कट्टप्पा तसेच गोळाफेक प्रशिक्षक मोहिंदरसिंग ढिल्लन या दोघांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र, त्यांच्याकडे ऑलिम्पिक पात्रता मिळवलेला एकही खेळाडू प्रशिक्षण घेत नव्हता, त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सुरू असलेल्या सरावावर कोणताही परिणाम होणार नाही, असे साईकडून सांगण्यात आले आहे.
पतियाळा केंद्रात 313 खेळाडूंच्या तसेच बेंगळुरू येथे 428 जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी पतियाळा केंद्रातून 26 जणांना तर बेंगळुरू केंद्रातून चार जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
पतियाळा केंद्रात 26 जण करोनाबाधित असल्याचे समोर आले असून, त्यात 16 खेळाडू व 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 16 खेळाडूंमध्ये 10 मुष्टियुद्धपटू व सहा धावपटू आहेत. त्यात आशियाई रजतपदक विजेता मुष्टियोद्धा दीपक कुमार व भारतीय ओपन गट राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता संजित यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह या केंद्रात सराव करत असलेल्या अन्य काही खेळाडूंच्या चाचण्यांचे अहवाल अद्याप आलेले नसले तरीही बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असेही साईकडून सांगण्यात आले आहे. बेंगळुरूच्या केंद्रात सराव करत असलेल्या ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना मात्र करोनाची बाधा झालेली नसल्याने काळजीचे कारण नाही. बाधितांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून, संपूर्ण इमारत सातत्याने सॅनिटाईझ करण्यात येत आहे, असेही साईने स्पष्ट केले आहे.
ऑलिम्पिकच्या सरावावर कोणताही परिणाम होणार नाही. करोनाग्रस्त खेळाडूंना साईच्या केंद्रातील वेगळ्या इमारतीत विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. लक्षणे सौम्य असल्यामुळे या करोनाबाधित खेळाडूंना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, असेही साईने सांगितले आहे.
चाचण्यांची संख्या वाढणार
येत्या 23 जुलैपासून जपानमध्ये सुरू होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पतियाळा केंद्रात मुष्टियुद्धाचा, तसेच ऍथिलेटिक्ससह अन्य काही क्रीडा प्रकारातील खेळाडूंचा सराव सुरू आहे. या पुढील काळातही खेळाडूंच्या सातत्याने चाचण्या घेतल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.