मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी करत सत्ता पालट केली. त्यानंतर आता शिवसेना नेमकी कोणाची, हा संघर्ष सुरु झाला आहे. दरम्यान, या पक्षफुटीला शिवेसेनेचे खासदार संजय राऊत हेदेखील जबाबदार आहेत, असे बंडखोर गटाकडून म्हटले जात आहे. तर दुसरीकडे मी एक शिवसैनिक असून शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे संजय राऊतांनी सांगितलेले आहे. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राऊतांनी जुना फोटो शेअर करुन त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या त्यांच्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना राऊतांनी एक जुना फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे असल्याचे दिसत आहे. तसेच दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. हाच फोटो पोस्ट करुन राऊतांनी उद्धव ठाकरेंना मित्र म्हटले आहे.
“ये दोस्ती….हम नही तोडेंगे…आपण आमच्या आयुष्यात खास आहात…वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड आणि निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना !” असे संजय राऊत म्हणाले आहेत.